NEET पाठोपाठ MHT-CET परीक्षेतही गैरप्रकार? दहावी, बारावीत नापास विद्यार्थी टॉपर्सच्या यादीत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 17:18 IST2026-05-19T17:16:51+5:302026-05-19T17:18:13+5:30
MHT-CET Exam: देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणानंतर आता महाराष्ट्रातील एमएच-सीईटी प्रवेश परीक्षेतही मोठा गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

NEET पाठोपाठ MHT-CET परीक्षेतही गैरप्रकार? दहावी, बारावीत नापास विद्यार्थी टॉपर्सच्या यादीत!
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणानंतर आता महाराष्ट्रातील एमएच-सीईटी प्रवेश परीक्षेतही मोठा गैरप्रकार झाल्याचा संशय काँग्रेसने व्यक्त केला. "इयत्ता १२ वीच्या परीक्षेत अवघे ३७ टक्के मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला सीईटी परीक्षेत थेट ९९ पर्सेन्टाईल गुण कसे काय मिळू शकतात?" असा सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केला. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी याचे काही धक्कादायक पुरावे सादर केले.
पत्रकारांशी बोलताना सचिन सावंत यांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या कारभारावर गंभीर बोट ठेवले. ते म्हणाले की, "इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत अवघे ४० किंवा ४५ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना एमएच-सीईटी परीक्षेत १०० टक्के गुण मिळाले आहेत. अशा संशयास्पद विद्यार्थ्यांची संपूर्ण यादीच आम्ही पुराव्यासाहित जाहीर केली आहे. हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेला अत्यंत गंभीर मुद्दा आहे."
अभियांत्रिकी आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या या प्रवेश परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना सावंत यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला. "बारावीची बोर्ड परीक्षा आणि एमएच-सीईटी या दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम समान असतो. एमएच-सीईटीसाठी तर अकरावी आणि बारावी अशा दोन्ही वर्षांचा कसून अभ्यास करावा लागतो. जो विद्यार्थी दोन वर्षे सलग अभ्यास करतो, त्याला मुख्य बोर्ड परीक्षेत अत्यंत कमी गुण मिळतात आणि सीईटीमध्ये मात्र तो थेट १०० टक्के गुण खेचून आणतो, हे अनाकलनीय आहे," असे सावंत म्हणाले.
सचिन सावंत यांनी या प्रकरणाबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवला. मात्र, त्यावर राज्य सीईटी सेलने दिलेले स्पष्टीकरण अत्यंत बेजबाबदारपणाचे होते, असा आरोपही त्यांनी केला. "काल मी केलेल्या ट्विटला सीईटी सेलने अत्यंत बेफिकिरीचे आणि उडवाउडवीचे उत्तर दिले," असे ते म्हणाले.
महाराष्ट्र सरकारच्या State Common Entrance Test 2025-26 ची टॉपर यादी मुख्यमंत्र्यांसह महायुतीच्या सर्व नेत्यांनी पहावी.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 18, 2026
या निकालात ७ विद्यार्थ्यांना १०० percentile मिळाले असून १३ विद्यार्थ्यांची percentile 99.999 आहे.
परंतु विशेष म्हणजे अनुक्रमांक १, २, ५, ९, १३ आणि १५ या… https://t.co/B0dFnQn2Uy
नीट परीक्षेतील घोटाळ्यामुळे आधीच देशातील लाखो विद्यार्थी तणावात असताना, आता राज्यातील अभियांत्रिकी प्रवेशाचा मुख्य आधार असलेल्या 'एमएच-सीईटीबाबतही काँग्रेसने पुराव्यांसह शंका उपस्थित केल्यामुळे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.