शिवराज मोटेगावकरला अटक: का आणि कशी झाली कारवाई? CBI तपासातील ५ मोठे खुलासे समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 16:18 IST2026-05-19T16:16:44+5:302026-05-19T16:18:13+5:30
९ तास घरात झाडाझडती अन् पुण्यात ११ तास मॅरेथॉन चौकशी; पुरावे डिलीट करण्याचा मोटेगावकरांचा प्रयत्न सीबीआयने उधळला!

शिवराज मोटेगावकरला अटक: का आणि कशी झाली कारवाई? CBI तपासातील ५ मोठे खुलासे समोर
लातूर : देशभरात गाजत असलेल्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात 'आरसीसी' क्लासेसचे संस्थापक प्रा. शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. मोटेगावकर याच्या अटकेमागील नेमकी कारणे काय आहेत आणि सीबीआयने अत्यंत गुप्ततेने ही कारवाई कशी केली, याचा धक्कादायक उलगडा आता सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून झाला आहे.
मोटेगावकरला अटक का झाली? ५ प्रमुख कारणे
सीबीआयने न्यायालयात आणि तपासादरम्यान मोटेगावकर यांच्यावर अत्यंत गंभीर ठपके ठेवले आहेत:
१. संघटित रॅकेटमध्ये सहभाग: नीट पेपरफुटीचे देशभरात संघटित रॅकेट चालवणाऱ्या आंतरराज्य टोळीमध्ये प्रा. मोटेगावकर हा सक्रिय सहभागी असल्याचा प्राथमिक निष्कर्ष सीबीआयने काढला आहे.
२. मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका: मोटेगावकर याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल आणि डिजिटल पुराव्यांवरून त्यांना नीट परीक्षेचा मुख्य पेपर परीक्षेच्या आधीच मिळाला होता, हे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या मोबाईलमध्ये परीक्षेचे प्रश्न आणि अधिकृत उत्तरपत्रिका आढळून आली आहे.
३. पेपर सेटरशी थेट कनेक्शन: नीट परीक्षेचे अधिकृत पेपर सेटर प्रा. पी.व्ही. कुलकर्णी याच्याशी मोटेगावकरचे थेट लागेबंधे होते आणि त्यांच्याच माध्यमातून हा पेपर लीक झाल्याचे समोर आले आहे.
४. माहिती डिलीट करण्याचा प्रयत्न: सीबीआयचा छापा पडणार याची कुणकुण लागताच मोटेगावकरने आपल्या मोबाईलमधील प्रश्नसंच, पीडीएफ आणि इतर महत्त्वाचे पुरावे डिलीट करून नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, जो सीबीआयने फॉरेन्सिक तपासाद्वारे उघड केला.
५. पुढील साखळी लपवली: हा मिळालेला गोपनीय पेपर मोटेगावकरने पुढे नक्की कोणत्या विद्यार्थ्यांना, पालकांना किंवा एजंटना दिला? आणि त्या बदल्यात किती कोटींची उलाढाल झाली, हे सांगण्यास त्याने नकार दिला. ही 'लास्ट माईल साखळी' शोधण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.
अटकेचा थरार: सीबीआयने कशी केली कारवाई?
मोटेगावकर याच्या अटकेची प्रक्रिया सीबीआयने अत्यंत गोपनीय आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण केली
१५ मे (लातूरमध्ये ९ तास चौकशी): सीबीआयच्या पथकाने सर्वप्रथम १५ मे रोजी लातूर येथील मोटेगावकर याच्या निवासस्थानी धडक दिली होती. तिथे जवळपास ९ तास त्यांची कसून चौकशी करण्यात आली. या छाप्यात सीबीआयने आरसीसीच्या सराव प्रश्नपत्रिका, मोटेगावकर यांचा वैयक्तिक मोबाईल आणि इतर महत्त्वाचे डिजिटल दस्तऐवज जप्त करून पथक रवाना झाले होते.
१७ मे (पुण्यात ११ तास मॅरेथॉन चौकशी अन् अटक): लातूरमधील पुराव्यांच्या आधारे सीबीआयने मोटेगावकरला पुण्याच्या कार्यालयात पाचारण केले होते. त्यानुसार रविवारी (१७ मे) ते पुणे सीबीआय कार्यालयात हजर झाले. तिथे अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या मोबाईल डेटाचा दाखला देत त्याची तब्बल ११ तास मॅरेथॉन चौकशी केली. जबाबात कमालीची विसंगती आढळल्यानंतर आणि गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाल्यानंतर सीबीआयने त्याला अधिकृतपणे अटक करून न्यायालयात हजर केले.