Zilla Parishad schools to IPS officers |  जिल्हा परिषदेची शाळा ते आयपीएस अधिकारी, दिगम्बर प्रधान यांचा लखलखता जीवनप्रवास

 जिल्हा परिषदेची शाळा ते आयपीएस अधिकारी, दिगम्बर प्रधान यांचा लखलखता जीवनप्रवास

ठळक मुद्दे दिगम्बर प्रधान यांचा लखलखता जीवनप्रवाससिध्दनेर्लीतील शेतकरी कुटुंबात आनंदाचे भरते

विश्वास पाटील

कोल्हापूर : सामान्य शेतकरी कुटुंबातील जन्म, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलेल्या डॉ. दिगंबर पांडुरंग प्रधान यांना बुधवारी केंद्रशासनाने भारतीय पोलिस सेवेत (आयपीएस) बढती  दिली.  प्रधान  यांचे  मुळ  गांव  कागल  तालुक्यातील  सिध्दनेर्ली.  त्यांच्या  या पदोन्नतीने कुटुंबासह गावालाही आनंदाचे भरते आले. डॉ. प्रधान सध्या ठाणे पोलिस अधिक्षक  (वाहतूक)  म्हणून  जबाबदारी  सांभाळत होते.

कुणालाही अभिमान वाटावा असाच प्रधान यांचा जीवनप्रवास आहे. त्यांचे वडिल हे हाडाचे शेतकरी. तशी शेतीही जेमतेमच. चुलते दामोदर गुरव हे आदर्श शिक्षक. आपल्या कुटुंबातील मुले चांगली शिकली पाहिजेत असा त्यांचा आग्रह.  शिक्षणाचे  महत्व  जाणून  त्यांनी  प्रधान (नंतर आडनांव बदलले) यांना जिल्हा परिषदेच्या शिंगणापूर निवासी शाळेत पाचवीला घातले. तेथून त्यांच्या आयुष्याची  दिशाच  बदलली. शैक्षणिक गुणवत्तेत कामयच अग्रेसर आणि जीवन  घडविण्यासाठी  वाट्टेल  तेवढे  कष्ट  घेण्याची  तयारी  असल्याने  यशाचे एकेक टप्पे त्यांनी पार केले. 

महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर मिरज वैद्यकीय  महाविद्यालयातून  ते  एमबीबीएस  झाले. कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे आरोग्याधिकारी म्हणून त्यांनी आठ वर्षे नोकरी केली. त्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्रात पाचव्या क्रमाकांने उत्तीर्ण होवून ते पोलिस उपअधीक्षक  झाले. 

तासगांव, मिरज,कराड येथे त्यांनी पोलिस उपअधिक्षक म्हणून आपली छाप पाडली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी पुणे व नाशिक येथेही काम केले. कोल्हापूरला प्रभारी पोलिस अधिक्षक म्हणूनही त्यांनी कांही महिने  काम  केले. चांगली शारिरीक क्षमता, कमालीचा संयम, अधिकारी असल्याचा गर्व नाही आणि स्वच्छ चारित्र्य  जपत  त्यांनी  केलेल्या  सेवेचे आज चीज झाल्याची प्रतिक्रििया समाजातूनही उमटली.

लष्करी अधिकारी म्हणून मिळाली होती संधी 

प्रधान महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांना लष्करात वैदयकीय शिक्षणाची संधी मिळाली होती, परंतु त्यांनी त्याऎवजी नागरी वैदयकीय सेवेला प्राधान्य दिले व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे चांगली सेवा केली. 

Web Title: Zilla Parishad schools to IPS officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.