कोल्हापुरात बीएसएनएल कार्यालयातून सात कोटींचे टॉवरचे साहित्य लंपास, सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 12:11 IST2026-03-19T12:10:47+5:302026-03-19T12:11:52+5:30
चोरट्यांनी खिडकीचे लोखंडी गज कापून आत प्रवेश केला

संग्रहित छाया
कोल्हापूर : न्यू शाहूपुरी येथील संचार कॉलनीत बीएसएनएलच्या बंद कार्यालयातून सात कोटी एक लाख ८६ हजार रुपयांचे टॉवरचे साहित्य चोरट्याने लंपास केले. हा प्रकार १४ ते १५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घडला. याबाबत बीएसएनएलचे अधिकारी रविकांत शेषनारायण ओझा (४४, सध्या रा. ताराबाई पार्क, कोल्हापूर, मूळ रा. बिहार) यांनी बुधवारी (दि. १८) शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएनएल कंपनीच्या मोबाइल टॉवरचे काही साहित्य संचार कॉलनी येथील एका बंद कार्यालयात ठेवले होते. चोरट्यांनी खिडकीचे लोखंडी गज कापून आत प्रवेश केला. आतील लाकडी कपाटाचे कुलूप तोडून कंट्रोलकार्ड, ऑप्टिकल मॉड्युलर, आरसीए कार्ड असे साहित्य लंपास केले.
हा प्रकार दोन दिवसांपूर्वी निदर्शनास आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने व्यवस्थापक ओझा यांनी फिर्याद दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक आकाश जाधव करीत आहेत.