Kolhapur: टीईटी पेपर फुटीमध्ये पुणे, मुंबईच्या तीन आरोपींचाही सहभाग, आत्तापर्यंत २९ जणांवर गुन्हा, १८ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 12:17 IST2025-12-01T12:16:54+5:302025-12-01T12:17:25+5:30
आरोपींच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांची पथके रवाना

Kolhapur: टीईटी पेपर फुटीमध्ये पुणे, मुंबईच्या तीन आरोपींचाही सहभाग, आत्तापर्यंत २९ जणांवर गुन्हा, १८ जणांना अटक
कोल्हापूर : शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर फोडणाऱ्या रॅकेटची व्याप्ती वाढत आहे. राज्यातील पुणे, मुंबई येथील आणखी तीन आरोपींचा सहभाग या रॅकेटमध्ये उघड झाला आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत २९ जणांवर गुन्हा दाखल केला असून, १८ जणांना अटक झालेली आहे. दरम्यान, पाटण्यासह राज्यातील आरोपींच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांची दोन पथके रविवारी रवाना झाली आहेत.
टीईटी परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून कोल्हापूर पोलिसांनी सुरुवातीला २६ जणांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार महेश भगवान गायकवाड (वय ४०, रा. कऱ्हाड) याच्या तपासात रोज नवीन माहिती समोर येत आहे. आत्तापर्यंत पाटणा येथील पाचजणांसह पुणे आणि मुंबई येथील तीन आरोपींचा समावेश झाल्याने आता या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या २९वर पोहोचली आहे.
या प्रकरणातील १६ जणांचे जामीन अर्ज कागल न्यायालयाने शुक्रवारी फेटाळले होते. मात्र आणखी दोघांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. या दोघांच्या जामीन अर्जावर आज, सोमवारी सुनावणी होणार आहे.
पुणे, मुंबईच्या संशयितांची भूमिका काय
या रॅकेटमध्ये पुणे, मुंबई येथील नव्याने समोर आलेल्या संशयितांची नेमकी भूमिका काय, हे येत्या एक-दोन दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे. दरम्यान, त्यांना अटक करण्यासाठी एक पथक रविवारी रवाना झाले आहे.