औद्योगिक क्षेत्रातील ‘ग्लोबल प्लेअर’ होण्यासाठी नावीन्यपूर्ण विचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:22 IST2021-01-21T04:22:34+5:302021-01-21T04:22:34+5:30

कोल्हापूर : केवळ निर्यातदार नव्हे, तर औद्योगिक क्षेत्रातील ‘ग्लोबल प्लेअर’ होण्यासाठी कोल्हापुरातील उद्योजकांनी तंत्रज्ञानाचा वापर आणि नावीन्यपूर्ण विचार करावा, ...

Think of innovation to become a ‘global player’ in the industrial sector | औद्योगिक क्षेत्रातील ‘ग्लोबल प्लेअर’ होण्यासाठी नावीन्यपूर्ण विचार करा

औद्योगिक क्षेत्रातील ‘ग्लोबल प्लेअर’ होण्यासाठी नावीन्यपूर्ण विचार करा

कोल्हापूर : केवळ निर्यातदार नव्हे, तर औद्योगिक क्षेत्रातील ‘ग्लोबल प्लेअर’ होण्यासाठी कोल्हापुरातील उद्योजकांनी तंत्रज्ञानाचा वापर आणि नावीन्यपूर्ण विचार करावा, असे आवाहन पुण्यातील प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी बुधवारी केले.

कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे (केईए) आयोजित उद्योग श्री आणि जीवनगौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्यांनी ‘माय जर्नी फ्रॉम अन एक्स्पोर्टर टू अ ग्लोबल प्लेअर’ या विषयावर मार्गदर्शन केले. असोसिएशनच्या उद्योगपती माधवराव बुधले सभागृहातील या कार्यक्रमात ज्येष्ठ उद्योजक वसंतलाल दलाल, उद्योजिका शारदा मोहिते यांना उद्योग श्री पुरस्काराने गौरविण्यात आले. पंडितराव जाधव यांचा उद्योग श्री पुरस्कार त्यांच्या पत्नी प्रेमला आणि चिरंजीव आमदार चंद्रकांत जाधव, नगरसेवक संभाजी जाधव यांनी स्वीकारला. उद्योजक प्रकाश चरणे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. चौधरी यांच्याहस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

कोईमतूर, कोल्हापूर, राजकोट या शहरांनी औद्योगिकक्षेत्रातील सुरूवातीची प्रगतीची पाऊले एकाचवेळी टाकली. मात्र, कौशल्य असूनही सध्या कोल्हापूर थोडे मागे पडले आहे. या क्षेत्रात गती घेण्यासाठी कोल्हापूरच्या उद्योजकांनी त्यांच्या कास्टिंग्जसह विविध उत्पादनांमध्ये मूल्यवर्धित बाबींचा समावेश करणे आवश्यक आहे. आपण ज्यांना निर्यात करतो, त्यांच्या व्यवस्था आणि यंत्रणेचा विचार करून त्यादृष्टीने मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती केल्यास चांगला परतावा मिळून प्रगतीची गती वाढेल. कोल्हापुरातून सुरूवात केलेल्या ‘प्राज’ने तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण विचाराच्या जोरावर जागतिक भरारी घेतल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले.

या कार्यक्रमात आमदार जाधव, प्रकाश चरणे, रेखा पाटील, विराग दलाल, नितीन वाडीकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राधामनी मेनन, ‘केईए’चे कमलाकांत कुलकर्णी, प्रसन्नकुमार तेरदाळकर, उद्योजक बाबाभाई वसा, अतुल पाटील, श्रीकांत पोतनीस, गोरख माळी, प्रदीपभाई कापडिया, सचिन शिरगावकर, नीरज शहा, संदीप वैद्य आदी उपस्थित होते.

‘केईए’चे अध्यक्ष रणजित शाह यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष हर्षद दलाल यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. उपाध्यक्ष दिनेश बुधले यांनी आभार मानले. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले.

दरम्यान, या कार्यक्रमापूर्वी कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्राच्या वाटचालीचे ‘म्युरल’ आणि उद्योगपती राम मेनन प्लाझाचे उद्‌घाटन डॉ. चौधरी, तर फोटो गॅलरीचे उद्‌घाटन राधामनी मेनन यांच्याहस्ते झाले.

Web Title: Think of innovation to become a ‘global player’ in the industrial sector