शिवसेना सामुदायिक नेतृत्वाखाली निवडणूक लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:22 IST2021-01-21T04:22:45+5:302021-01-21T04:22:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेतील सर्वच पदाधिकारी सामुदायिक नेतृत्व करणार आहेत. ‘गटबाजी न करता सर्वांनी ...

Shiv Sena will contest elections under community leadership | शिवसेना सामुदायिक नेतृत्वाखाली निवडणूक लढविणार

शिवसेना सामुदायिक नेतृत्वाखाली निवडणूक लढविणार

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेतील सर्वच पदाधिकारी सामुदायिक नेतृत्व करणार आहेत. ‘गटबाजी न करता सर्वांनी सामूहिकपणे निवडणुकीला सामोर जा’, अशा सक्त सूचना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिल्यामुळे, मागच्या सर्वच निवडणुकीत पाहायला मिळालेली गटबाजी महापालिका निवडणुकीत दिसणार नाही. परिणामी शिवसेनेचे शिवधनुष्य कोणा एकाच्या खांद्यावर असणार नाही, तर सर्वांनीच त्याला हातभार लावायचा आहे.

शिवसेना म्हटले की, ‘चार जणांची तोंडे चार दिशेला’ असे समीकरण गेल्या काही वर्षांपासून झाले होते. त्यामुळे कोणत्याही निवडणुकीत पक्षाला यशापेक्षा अपयशाचाच सामना करावा लागला होता. परंतु आता राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री व महाआघाडीचे सरकार असल्यामुळे शिवसेनेला सर्वच निवडणुकीत चांगली कामगिरी करावी लागणार आहे. तशा सक्त सूचना पक्षनेतृत्वाने दिल्या आहेत.

शिवसेनेतील गटबाजीमुळे गेल्या दोन निवडणुकीत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आपल्या ताकदीवर महापालिकेची निवडणूक लढविली. पक्षांतर्गत गटबाजीमुळे त्यांना समाधानकारक यश मिळाले नाही. या निवडणुकीतही उमेदवारी वाटप कोण करणार, असा गुंता तयार झाला होता. परंतु त्यावर पक्षानेच उत्तर शोधले आहे. गत निवडणुकीतील अनुभव लक्षात घेता, शिवसेनेच्या सर्व स्थानिक नेत्यांना महापालिकेच्या निवडणुकीत सामुदायिकपणे नेतृत्व करण्याचा सल्ला दिला आहे. पक्षाने महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी संपर्कमंत्री उदय सामंत व संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्यावर सोपविली आहे.

अशी असेल समिती...

सामंत व दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री दिवाकर रावते, खासदार संजय मंडलिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, शिवाजीराव जाधव यांची एक समिती नियुक्त केली जाणार आहे.

निवडून येण्याची क्षमता..

ही समिती उमेदवारांच्या मुलाखती घेणार असून कोणत्या प्रभागात कोणाला उमेदवारी द्यायची हे ठरविणार आहे. वशिलेबाजीपेक्षा निवडून येण्याची क्षमता हा महत्त्वाचा निकष उमेदवारी देताना राहील. पक्षप्रमुखच मुख्यमंत्री असल्याने राज्यातील सत्तेचा उपयोग करून स्थानिक पातळीवरील निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याबद्दलच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत.

- सक्षम उमेदवारांचा शोध सुरू

जबाबदारी वाटून दिल्यानंतर आता सर्वच प्रमुख पदाधिकारी त्यांच्या प्रभागातील सक्षम व निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांचा शोध घेत आहेत. नुसता शोधच घ्यायचा नाही, तर निवडून सुध्दा आणायचे आहे. पक्षप्रमुखांच्या आदेशामुळे आता पदाधिकाऱ्यांनाही आपला परफॉर्मन्स दाखवावा लागणार आहे.

- ४० ते ४५ प्रभागांवर विशेष लक्ष

सर्व जागा लढवून सगळीकडेच ताकद घालवून हाती काहीही न पडण्यापेक्षा, शहरातील ४० ते ४५ प्रभागांवर विशेष लक्ष देऊन २० ते २५ नगरसेवक निवडून आणण्याचे शिवसेनेचे नियोजन आहे.

कोट - १.

निवडणुकीची तयारी सुरू केली असून आम्ही सामुदायिकपणे लढणार आहोत. जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील याकडे सर्वांचे लक्ष असेल.

- संजय पवार, जिल्हा प्रमुख

कोट - २

नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी सर्वच पदाधिकाऱ्यांनी वाटून घेतली आहे. शिवसेना पूर्ण ताकदीने निवडणूक लढणार असल्याने आमच्या शिवाय अन्य कोणाची सत्ता होणार नाही, एवढी सिध्दता आम्ही दाखवू.

- राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष,

राज्य नियोजन मंडळ

Web Title: Shiv Sena will contest elections under community leadership