Kolhapur Crime: आश्रमशाळेतील विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाकडून अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 15:38 IST2026-01-14T15:37:31+5:302026-01-14T15:38:18+5:30
मुलाच्या फ्लॅटवर नेऊन गैरकृत्य

Kolhapur Crime: आश्रमशाळेतील विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाकडून अत्याचार
कोल्हापूर : कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेतील मुख्याध्यापक कृष्णा ज्ञानू दाभोळे (वय ५५, रा. सावर्डेकर कॉलनी, मुरगुड, ता. कागल) याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्याला मंगळवारी (दि. १३) अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याची पोलिस कोठडीत रवानगी झाली.
जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेतील कृष्णा दाभोळे हा कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेत मुख्याध्यापक आहे. दहावी पास होऊन आश्रमशाळेतून बाहेर पडलेल्या १६ वर्षीय विद्यार्थिनीशी त्याने लगट केली. ऑगस्ट आणि ऑक्टोबर २०२५ मध्ये त्याने जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या पीडित मुलीने हा प्रकार आईला सांगितला. या माय-लेकीने पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांच्याकडे तक्रार अर्ज दिला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अधीक्षकांनी तातडीने महिला सहाय्य कक्षात तिचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार जुना राजवाडा पोलिसांनी मुख्याध्यापकावर बाललैंगिक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. तातडीने मंगळवारी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा अधिक तपास शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्याकडून सुरू आहे.
मुलाच्या फ्लॅटवर नेऊन गैरकृत्य
मुख्याध्यापक दाभोळे याचा मुलगा खासगी नोकरी करतो. त्याने कोल्हापुरात नवीन फ्लॅट घेतला आहे. रिकाम्या फ्लॅटमध्ये नेऊन मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीवर अत्याचार केले. मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई होताच जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली. त्याची सखोल चौकशी करून कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.