नवजात नातीचे हत्तीवरून मिरवणुकीने स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:22 IST2021-01-21T04:22:41+5:302021-01-21T04:22:41+5:30

दिलीप चरणे लोकमत न्यूज नेटवर्क नवे पारगाव : मुलगा वंशाचा दिवा मानला गेल्याने स्त्री भ्रूणहत्या होत आहेत. आजही मुलींच्या ...

Newborn grandchildren welcomed by elephant procession | नवजात नातीचे हत्तीवरून मिरवणुकीने स्वागत

नवजात नातीचे हत्तीवरून मिरवणुकीने स्वागत

दिलीप चरणे

लोकमत न्यूज नेटवर्क

नवे पारगाव : मुलगा वंशाचा दिवा मानला गेल्याने स्त्री भ्रूणहत्या होत आहेत. आजही मुलींच्या जन्मदराचा टक्का घसरत असल्याचे दिसते. सैन्यदलात कॅप्टन म्हणून निवृत्त झालेल्या चावरे (ता. हातकणंगले) येथील गणपतराव महाडिक यांनी त्यांची नात 'तीर्था'चे स्वागत गावातून हत्तीवरून मिरवणूक काढत केले. महाडिक- घोडके कुटुंबीयांनी एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवल्याने त्यांचे परिसरात कौतुक होत आहे.

पारगाव येथील विश्व वारणा पब्लिक स्कूलचे संस्थापक गणपतराव भगवान घोडके यांची नात व दीपक व डॉ. दीपिका महाडिक यांची कन्या तीर्था हिचे पहिल्यांदा चावरेत आगमन होणार होते. समाजात मुलगाच वंशाचा दिवा मानल्याने स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण वाढले आहे. मुलगी झाल्यानंतर घरात निराशा पसरते. कॅप्टन गणपतराव घोडके, पत्नी अलका, मुलगा दीपक, स्नुषा डॉ. दीपिका महाडिक यांनी "कन्या वाचवा" अभियान, स्त्री भ्रूणहत्या, मुलींच्याबाबतचा समाजात दृष्टिकोन बदलण्यासाठी व जाणीव जागृती होण्यासाठी 'तीर्था'ची हत्तीवरून मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. वनविभाग, पोलीस या यंत्रणांची परवानगी काढून हत्ती आणला. गावच्या वेशीवरून डॉ. दीपिका, तीर्था यांची तुतारीसह सवाद्य मिरवणूक काढली. हत्तीवरून पेढे, साखर वाटली.

मुलीसुद्धा मुलांच्या बरोबरीने कर्तव्य बजावत कोणत्याही क्षेत्रात कमी नसतात हे स्पष्ट करताना त्यांनी मुलींची शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके आयोजित केली. त्यानंतर रात्री स्नेहभोजनानंतर स्वरसंगीत कार्यक्रमातील मराठी, हिंदी भक्तिमय गीतांनी नागरिकांची मनोरंजनासह मेजवानी झाली. महाडिक कुटुंबीयांसह विश्व वारणा पब्लिक स्कूलचे सचिव डी. पी. पाटील, प्रा. संभाजी पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

२०पारगाव

फोटो ओळी: चावरे येथील कॅप्टन गणपतराव घोडके - महाडिक यांची नात तीर्था हिची गावातून हत्तीवरून मिरवणूक काढून गावाला पेढे व साखर वाटली.

Web Title: Newborn grandchildren welcomed by elephant procession