एडिट केलेला फोटो पाठवून तरुणाचं लग्न मोडलं; १० महिन्यांनंतर 'त्या' मेसेजचं सत्य आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 14:35 IST2026-04-15T14:35:57+5:302026-04-15T14:35:57+5:30
एडिट फोटो पाठवून तरुणाचे ठरत असलेले लग्न मोडल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात घडला.

एडिट केलेला फोटो पाठवून तरुणाचं लग्न मोडलं; १० महिन्यांनंतर 'त्या' मेसेजचं सत्य आलं समोर
Kolhapur Crime: बार्शी येथील तरुणीच्या नातेवाइकांच्या मोबाइलवर अज्ञाताने तरुणाचे एडिट केलेले फोटो पाठवून ठरत असलेले लग्न मोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पांडुरंग सोपान लोहकरे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात फिर्याद दिली. महत्त्वाची बाब म्हणजे हा सगळा प्रकार गेल्यावर्षी घडला आणि १० महिन्यांनी हा प्रकार समोर आला.
शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागाळा पार्क येथील पांडुरंग लोहकरे यांच्या मुलाचे लग्न ठरवण्याचे काम सुरू होते. बार्शी येथील एका कुटुंबातील मुलीसोबत लग्नाची बोलणी सुरू होती. त्यावेळी अज्ञाताने तरुणीचे वडील आणि इतर नातेवाइकांच्या व्हॉट्सअॅपला त्या तरुणाचे एडिट केलेले फोटो पाठवले. लोहकरे कुटुंबीयांशी संबंध ठेवू नका, त्यांच्या मुलाशी लग्न केल्यास तुमच्या मुलीचे भवितव्य धोक्यात येईल, असा मेसेज केला.
कसं मोडलं लग्न?
अज्ञाताने लोहकरे यांच्या मुलासोबत एका मुलीचा हात दिसणारा बनावट फोटो पाठवला. यामुळे ठरणारे लग्न मोडले. २६ मे ते २२ जून २०२५ दरम्यान घडलेला प्रकार गेल्या आठवड्यात उघडकीस आला. याबाबत लोहकरे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, चुकीचे मेसेज पाठवून ठरणारे लग्न मोडणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
मोबाइल नंबरवरून शोध
मोबाइल नंबरवरून बनावट मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. दिशाभूल करून लग्न मोडण्याचा प्रकार गंभीर आहे. त्यामुळे संशयिताचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.