आंबा आरोग्य उपकेंद्राचा बनवला ‘ओपन बार’

By Admin | Updated: September 7, 2015 00:49 IST2015-09-07T00:49:25+5:302015-09-07T00:49:42+5:30

विदारक चित्र : सलाईनच्या खोक्यात दारुच्या बाटल्या; एका खोलीत दगडाची चूलही

Mango health sub-center made 'Open Bar' | आंबा आरोग्य उपकेंद्राचा बनवला ‘ओपन बार’

आंबा आरोग्य उपकेंद्राचा बनवला ‘ओपन बार’

आंबा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या तीन महिन्यांपासून डॉक्टर, आरोग्यसेविका नसल्याने बेवारस झालेल्या दवाखान्याला ‘बार’चे स्वरूप आल्याचे चित्र सरपंच प्रेरणा बेंडके यांनी शनिवारी केलेल्या पाहणीत उघड झाले. उघड्या दवाखान्यातील सलाईनच्या रिकाम्या खोक्यात काहींनी दारुच्या बाटल्या भरल्या असून शेजारच्या खोलीत तीन दगडांची चूल मांडली आहे. येथील दोन वैद्यकीय अधिकारी व दोन आरोग्यसेविकांची पदे रिक्त आहेत. जून महिन्यात ग्रामपंचायतीच्या शिष्टमंडळाने तालुका अधिकारी व पदाधिकाऱ्यांना भेटून डॉक्टरांची मागणी केली होती. मात्र, आजही पदे रिक्त असल्याने रुग्णांनी दवाखान्याकडे पाठ फिरवली आहे. रुग्णांना किरकोळ उपचारासाठी मलकापूरला जावे लागते. आरोग्य केंद्राची ही दयनीय अवस्था एका जागरुक तरुणाने व्हॉट्सअपवर टाकली आणि गावात दारूच्या बाटल्यांची चर्चा रंगली. व्हॉट्स अपवरचे हे फोटो पाहून सरपंच बेंडके यांनी सदस्य अनिल गवरे व मोनेरा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना घेऊन दवाखाना गाठला. त्यावेळी दवाखाना कर्मचाऱ्याविना सताड उघडा दिसला. सरपंचांच्या साक्षीने पुन्हा दारूच्या बाटल्यांचे चित्रीकरण झाले. बाहेरून सुसज्ज दिसणाऱ्या दवाखान्याला वालीच न उरल्याने हा दारूचा अड्डा बनतोय की काय, अशी भीती बेंडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. केंद्रातील एका रूममध्ये चूल थाटली आहे. शेजारच्या खोलीत सलाईनच्या बॉक्समध्ये चक्क देशी दारूच्या मोकळ्या बाटल्यांचा ढीग आहे. डॉक्टर नाही म्हणून रुग्ण नाही आणि आता येथे कोण फिरकत नाही म्हणून मद्यपींनी अड्डा जमवला आहे. जिल्हा प्रशासनाने येथील रिक्त पदे भरून येथील गैरकृत्याची चौकशी करावी, अशी मागणी बेंडके यांनी केली. आरोग्य अधिकारी पी. टी. ढेकळे यांच्याशी संपर्क साधला असता तालुक्यात आठ दवाखान्यांतील चार डॉक्टरांची पदे रिक्त असल्याचे सांगितले. पुढील महिन्यात पदे भरण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.


अन्यथा केंद्राला टाळे
पंधरा आॅगस्टच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी डॉक्टरांची मागणी केली. त्यानुसार डॉक्टराची लेखी मागणी ग्रामपंचायतीने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना केली आहे. मात्र प्रशासन ढिम्म असल्याची खंत बेंडके यांनी मांडली. येथील रिक्त पदे भरून दवाखान्याचे बनलेले अड्ड्याचे रूप बदलले नाही तर दवाखान्याला कुलूप ठोकण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य अनिल गवरे, बासुजी गद्रे यांनी दिला आहे.

Web Title: Mango health sub-center made 'Open Bar'