हद्दवाढीविरोधात गावसभेत ठराव करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:22 IST2021-01-21T04:22:32+5:302021-01-21T04:22:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : आगामी गावसभेत हद्दवाढीविरोधात ठराव करण्याचा निर्णय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात बुधवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ...

हद्दवाढीविरोधात गावसभेत ठराव करा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आगामी गावसभेत हद्दवाढीविरोधात ठराव करण्याचा निर्णय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात बुधवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी आमदार संपतराव पवार होते.
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी काेल्हापूरच्या हद्दवाढीचा फेरप्रस्ताव पाठवण्याची सूचना केल्यानंतर कोल्हापुरात पुन्हा एकदा हद्दवाढ कृती समिती पुनरुज्जीवित झाली आहे. कोल्हापूर शहराशेजारील गावातील लोकप्रतिनिधींच्या बैठकीत या प्रस्तावाला कडाडून विरोध करण्यात आला. संपतराव पवार म्हणाले, हद्दवाढीशिवाय विकास होत नाही, असे जाणीवपूर्वक भासवले जात आहे. मुळात सध्याच्या लोकांना सोयी-सुविधा मिळत नाहीत. रस्ते, गटर्स, शुद्ध पाणी या नागरिकांना देऊ शकत नाही, मग वाढीव गावांची काय अवस्था होईल. केवळ घरफाळा वाढल्याने कोल्हापूरचे सगळे प्रश्न सुटणार नाहीत, त्यासाठी शासनाने विकास निधी दिला, तरच कोल्हापूरचा विकास होऊ शकतो. ही गावे सुखाने राहत असताना त्यांचे सुख कोणी हिरावून घेत असेल, तर ते खपवून घेणार नाही. या गावांची ताकद दाखवण्यासाठी गावसभेत हद्दवाढ विरोधी ठराव करून ते शासनाला पाठवावेत.
भोगावती कारखान्याचे माजी संचालक बी.ए. पाटील, ‘आप’चे नारायण पोवार, प्रा. बी.जी. मांगले यांनी मनोगत व्यक्त केले.
बाजार समितीचे माजी संचालक अमित कांबळे, बाबूराव कदम, राजू माने, महेश जाधव आदी उपस्थित होते.
फोटो ओळी :
कोल्हापूर हद्दवाढीला विरोध करण्यासाठी बुधवारी शेकाप कार्यालयात सर्वपक्षीय बैठकीत संपतराव पवार यांनी मार्गदर्शन केले. (फाेटो-२००१२०२१-कोल-शेकाप)