Kolhapur: जिल्हास्तरावर मोठा औषधसाठा, ग्रामीण'ला वेळेत होईना पुरवठा; आरोग्यमंत्र्यांसमोर झालेल्या सादरीकरणामध्ये वस्तुस्थिती स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 13:03 IST2025-10-09T13:00:02+5:302025-10-09T13:03:28+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्रांकडेही लक्ष हवे

Kolhapur: जिल्हास्तरावर मोठा औषधसाठा, ग्रामीण'ला वेळेत होईना पुरवठा; आरोग्यमंत्र्यांसमोर झालेल्या सादरीकरणामध्ये वस्तुस्थिती स्पष्ट
कोल्हापूर : अनेकवेळा ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधे अपुरी असल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. यामध्ये तथ्य असल्याचे आरोग्य विभागाच्या कार्यशाळेत सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासमक्षच स्पष्ट झाले. त्यातही कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांत जिल्हास्तरावर मोठा औषधसाठा असून, तो वेळेत ग्रामीण रुग्णालयांना पाठवला जात नसल्याचे स्पष्ट झाले.
कोल्हापूर जिल्हा शल्य चिकित्सक यांना ६ कोटींचा तर सांगलीसाठी ९ कोटींचा निधी औषधे घेण्यासाठी मंजूर आहे. रत्नागिरीसाठी ८ कोटी ४० लाख, सिंधुदुर्गसाठी ४ कोटी मंजूर आहेत. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अनुक्रमे ७ कोटी, ४ कोटी, साडेसहा कोटी आणि दीड कोटी रुपये मंजूर आहेत.
वाचा - कोल्हापूर जिल्ह्यातील ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एकही प्रसूती नाही; सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये काय स्थिती..
यातील रत्नागिरी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्व औषधे खरेदी केली आहेत तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा प्रस्तावच आरोग्य उपसंचालकांकडे आलेला नाही. कोल्हापूरच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी ५५ लाखांची तर सिंधुदुर्गच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी ४० लाखांची औषध खरेदी केली आहेत. मात्र, जिल्ह्यातील अन्य शासकीय रुग्णालयांना ही औषधे पुरेशा प्रमाणात पाठवली जात नाहीत, असे दिसून येत आहे.
कोल्हापूर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडील उपलब्ध औषधसाठा - रुग्णालयांना पाठवण्यात आलेली औषधे
- टॅब सेफिक्झाईन -२०० एमजी- ९०,२०० / ३,७६०
- टॅब सेफ्पॉडॉक्जझाईन १०० एमजी - १,३१,४०० / २०००
- बी कॅाम्प्लेक्स - ४,८४,५०० / ९४,०९०
- २ मिलि सिरींज - ३,७१,३५० / १,७८,०५०
- प्री बायोटिक कॅप्सुल्स - ४५,००० / ००००
- टॅब कॅल्शिअम विथ व्हिटॅमिन - ४,१९,२०० / ९८,७००
रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडील उपलब्ध औषधसाठा - रुग्णालयांना पाठवण्यात आलेली औषधे
- कॅप. डॉक्झिसिलाईन / १,५७,०१० / ३३,७४०
- (ही आकडेवारी ऑगस्ट २०२५ अखेरची आहे.)
आकडेवारी भरण्याचा कंटाळा
औषधे वेळेत जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांना पुरवण्याबाबत सूचना देण्यात आल्या. ई-औषध प्रणाली विकसित करण्यात आली असून, अनेकदा वेळेत पुरवठा झालेला असतो. परंतु, त्याची नोंद न केल्याने या पुरवठ्याचे चुकीचे आकडे दिसत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांकडेही लक्ष हवे
अनेकदा प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे याठिकाणी औषधांची टंचाई असल्याच्या तक्रारी असतात. काही ठिकाणी तर ग्रामपंचायतींना त्यांच्या निधीतून औषधांची खरेदी करून द्यावी लागत असल्याची उदाहरणेही समोर आली आहेत.