Kolhapur-Gokul Dudh Sangh: ‘के. पी- ए. वाय.’ एकत्र येतात तर मग ‘बंटी-महाडिक’ का नाही?; सतेज पाटील यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 18:07 IST2026-05-12T18:04:40+5:302026-05-12T18:07:43+5:30
Kolhapur-Gokul Dudh Sangh: ‘गोकुळ’मध्ये महायुतीला शुभेच्छा

Artificial intelligence
कोल्हापूर : ‘बंटीसाहेब तुम्ही आणि महाडिक एकत्र येणार आहे, अशी जिल्ह्यात चर्चा सुरू आहे, त्यातील खरे काय?’ असा चिमटा माजी आमदार के. पी. पाटील यांनी काढल्यानंतर ‘जर तुम्ही व ए. वाय. पाटील एकत्र येत असाल तर मग ‘बंटी व महाडिक’ का नाही? असा पलटवार आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी केल्याने ऐकणाऱ्यांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या.
कोल्हापूर बाजार समितीच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी जिल्हा बँकेत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार सतेज पाटील, माजी आमदार संजय घाटगे, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, राजेश पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर आदींची बैठक झाली. बैठकीनंतर या नेत्यांमध्ये चांगलीच टोलेबाजी रंगली, त्याची चर्चा दिवसभर जिल्हा बँकेत सुरू होती.
‘गोकुळ’च्या राजकारणाचा संदर्भात देत सतेज पाटील यांच्याकडे पाहत, ‘बरे केले, आमच्यात भांडणे लावून तुम्ही मजा बघत बसलाय’ असे मंत्री मुश्रीफ म्हणाले. ‘माझे काय नाही, तुमचे महायुतीचे जोरात सुरू आहे, माझ्या तुमच्या महायुतीला शुभेच्छा आहेत’, असे सतेज पाटील म्हणताच, आम्ही महायुती म्हणूनच ‘गोकुळ’ची निवडणूक लढणार असल्याचे आमदार विनय कोरे यांनी सांगितले.
राजेश पाटील आमच्यासोबतच राहणार
‘गोकुळ’च्या निवडणुकीत महायुती म्हणूनच लढणार, असे आमदार कोरे यांनी सांगितल्यानंतर, ‘तुम्ही महायुती म्हणून लढा, पण माजी आमदार राजेश पाटील हे माझ्यासोबतच असतील’, असे संकेत आमदार सतेज पाटील यांनी दिले.
‘ए. वाय.’ आणि मी एकत्रच !
के. पी आणि ए. वाय.’ यांना एकत्र यायला चालते मग आम्ही का नाही? असे सतेज पाटील हे म्हटल्यानंतर के. पी. पाटील म्हणाले, ‘ए. वाय. पाटील व माझे कधीच भांडण नाही. आम्ही एकमेकांच्या विरोधात नाही एकत्रच आहोत’, हे ऐकून सगळे जोरात हसले.