Kolhapur News: १५ तोळे दागिने अन् लाखाची रोकड असलेली बॅग विसरली; पोलिसांनी चार तासांत शोधली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 16:38 IST2026-05-11T16:37:23+5:302026-05-11T16:38:13+5:30

दिवसभरात वर्दळ असूनही कोणी बॅग उचलली नाही

Forgot bag containing 15 tolas of jewelry and lakhs of cash kolhapur Police found it in four hours | Kolhapur News: १५ तोळे दागिने अन् लाखाची रोकड असलेली बॅग विसरली; पोलिसांनी चार तासांत शोधली

Kolhapur News: १५ तोळे दागिने अन् लाखाची रोकड असलेली बॅग विसरली; पोलिसांनी चार तासांत शोधली

कोल्हापूर : आजरा स्टॅण्डसमोर विसरलेली १५ तोळे दागिने आणि एक लाखाची रोकड असलेली बॅग पोलिसांनी चार तासात शोधून तक्रारदारास परत केली. ही घटना रविवारी (दि.१०) घडली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे २२ लाखांचे दागिने आणि एक लाखाची रोकड परत मिळाल्याने तक्रारदाराने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे पेरणोली (ता. आजरा) येथे राहणारे धनाजी बाबूराव कांबळे हे कुटुंबीयांसह रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल्सने मुंबईहून आजरा स्टॅण्डसमोर पोहोचले. गावाकडे जाण्यासाठी त्यांनी रिक्षा ठरवली. सोबतच्या बॅगा रिक्षात ठेवून ते गावी गेले. दुपारी बारा वाजेच्या सुमारास एकूण सहा बॅगांमधील दागिन्यांची बॅग त्यांना आढळली नाही. शोध घेऊनही सापडत नसल्याने ती ट्रॅव्हल्समध्ये विसरली असावी किंवा चोरीला गेली असावी अशी शंका त्यांना आली. ते तातडीने आजरा पोलिस ठाण्यात गेले.

कांबळे कुटुंबीय तक्रार देत असतानाच तिथे असलेले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अंमलदार समीर कांबळे यांनी तपासाला सुरुवात केली. संबंधित रिक्षाचालकाला फोन करून माहिती घेतली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यावेळी घाईत कांबळे कुटुंबीय दागिन्यांची बॅग एका दुकानासमोरच विसरल्याचे दिसले. दिवसभरात एका व्यक्तीने ती दुकानापासून १५ फूट अंतरावर अडगळीच्या जागेत सरकवल्याचे फुटेजमध्ये दिसले. त्यावरून तातडीने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता दागिन्यांची बॅग सापडली. त्यातील १५ तोळे दागिने आणि एक लाखाची रोकड मिळाली.

पोलिसांची तत्परता, नागरिकांचा प्रामाणिकपणा

सकाळी ७ वाजेच्या सुमारास हरवलेली बॅग दुपारी चारच्या सुमारास पोलिसांना सापडली. दिवसभरात वर्दळ असूनही कोणी बॅग उचलली नाही. ती उघडूनही पाहिली नाही. नागरिकांचा प्रामाणिकपणा आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे बॅग सापडली. आजरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शीतल डोईजड, उपनिरीक्षक संजय पाटील, अंमलदार वैभव गवळी यांनी बॅगचा शोध घेण्यास मदत केली.

Web Title : कोल्हापुर: पुलिस ने चार घंटे में खोए गहने, नकदी बरामद की

Web Summary : कोल्हापुर पुलिस ने अजरा स्टैंड के पास खोए 15 तोला सोने के गहने और ₹1 लाख नकद बरामद किए। सीसीटीवी फुटेज से बैग का पता लगाने में मदद मिली, जिससे ₹22 लाख मूल्य की वस्तुएं मालिक को वापस मिल गईं।

Web Title : Kolhapur: Lost Jewelry, Cash Recovered by Police in Four Hours

Web Summary : Kolhapur police swiftly recovered a bag containing 15 tolas of gold jewelry and ₹1 lakh cash, lost near Ajara stand. CCTV footage helped locate the bag, returning ₹22 lakh worth of valuables to the grateful owner.