विक्रेत्यांकडून फळांवर रासायनिक प्रक्रिया

By Admin | Updated: August 24, 2014 22:37 IST2014-08-24T21:25:50+5:302014-08-24T22:37:57+5:30

आरोग्यास धोका : शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना दुप्पट फायदा

Chemical process of fruit from vendors | विक्रेत्यांकडून फळांवर रासायनिक प्रक्रिया

विक्रेत्यांकडून फळांवर रासायनिक प्रक्रिया

कोपर्डे हवेली : इतर पिकांच्या तुलनेत फळ पिकांना जादा दर मिळत असल्याने सध्या बहुतांश शेतकऱ्यांनी फळ उत्पादनाला पसंती दिली आहे. मात्र, दर वाढल्यास कच्ची फळे खरेदी करून व्यापारी रासायनिक पद्धतीने ती पिकवून बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणत आहेत. रासायनिक प्रक्रियेद्वारे पिकवलेली अशी फळे आरोग्यास हानीकारक ठरत आहेत.
शेतकरी केळीचे पीक बारमाही घेतात. काही हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे बागांचे नुकसान होऊन शेती तोट्यात जाते़ मात्र, ज्याठिकाणी चांगले उत्पन्न निघाले आहे. तेथील केळीला चांगली मागणी असते़ बाजारपेठेत आवक कमी झाल्यानंतर केळीला चांगला दर मिळतो़ तसेच केळी एकाच वेळी पिकत नसल्याने बागेतील सर्वच घड एकावेळी काढता येत नाहीत़
आठ दिवसांच्या फरकाने केळीचे घड काढले जातात़ मात्र, सध्या व्यापारी शेतामधील माल खरेदी करून एकाच वेळेस केळीचे संपूर्ण घड काढत आहेत. त्यानंतर घडावर रासायनिक प्रक्रिया करून केळी पिकवली जात आहे. परिणामी, केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या किती तरी पटीने अधिक व्यापाऱ्यांना फायदा होतो़
जागतिक बाजारपेठेत आंब्यालाही चांगली मागणी आहे़ व्यापारी कच्चे आंबे खरेदी करून ज्वलनशील पावडरीचा वापर करून ती पिकवत आहेत़ नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकण्यास जास्त कालावधी लागतो. हा कालावधी वाचविण्यासाठी आणि अल्प वेळात जास्त पैसे मिळण्यासाठी व्यापारी अशा पद्धतीची रासायनिक प्रक्रिया करतात. रासायनिक प्रक्रियेद्वारे पिकवलेल्या फळाची चव वेगळी असते. अशा फळाचा दुष्परिणाम लगेचच जाणवत नसला तरी भविष्यात त्याचा फटका शरीराला बसतो. (वार्ताहर)

विशिष्ट गॅसचा वापर
रासायनिक प्रक्रियेद्वारे फळे पिकवण्याची प्रक्रिया घातक आहे़ फॉस्फरससारखा रासायनिक पदार्थ त्यासाठी वापरला जातो. तसेच विशिष्ट प्रकारचा गॅसही फळांचा साठा असलेल्या ठिकाणी सोडला जातो. फॉस्फरस व त्यासारखे अन्य काही पदार्थ ज्वलनशील समजले जातात. अशा पदार्थांचा वापर केल्यामुळे अतिउष्णतेतून फळे पिकत असली तरी त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
दर वाढताच होते प्रक्रिया
सर्व बागेतील केळीचे घड उतरविण्यास ३० ते ४० लागतात़ मात्र, शेतकरीही नैसर्गिकरीत्या केळी पिकण्याची वाट न पाहता व्यापाऱ्याला टनाप्रमाणे केळीची विक्री करतात. संबंधित व्यापारी केळी खरेदी करून एकाच वेळी सर्व घड उतरवितात. त्यानंतर ते घड गोडावूनमध्ये ठेवले जातात. तसेच बाजारपेठेत दर वाढला की रासायनिक प्रक्रिया करून त्वरित केळी पिकवली जाते.
कशी ओळखायची रासायनिक प्रक्रिया ?
नैसर्गिकरीत्या पिकलेल्या केळी दिसायला उठावदार नसतात. सुरुवातीला हिरवट पिवळा रंग असतो. त्यानंतर हळूहळू केळीवर काळे डाग पडत जातात. मात्र, रासायनिक प्रक्रिया करून पिकविलेली केळीला उठावदार भडक पिवळा रंग असतो. केळीच्या आतील गाभ्याला काळे डागे असतात.

Web Title: Chemical process of fruit from vendors