कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक चौकामध्ये पुण्याकडे जाणाऱ्या दोन प्रवाशांना चाकूच्या धाकाने मारहाण करून लुटण्याचा प्रकार घडला. शुक्रवारी रात्री साडेबारा वाजता दोन्हीही घटना घडल्या. लॅपटॉप, मोबाइल संच, सोन्याची अंगठी व रोख रकमेसह सुमारे ५० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. शनिवारी रात्री उशिरा घटनेची नोंद शाहुपुरी पोलिसांत झाली. याप्रकरणी हाजगोळीचे माजी सरपंच रवींद्र अप्पासाहेब जाधव (वय ५०, रा. हाजगोळी खुर्द, ता. आजरा, पो. मडिलगे) तसेच केदार रवींद्र घोडके (वय ३१, रा. सनशाईन हिल व्हूज सोसायटी, कात्रज, पुणे) यांनी शाहुपुरी पोलिसांत तक्रार दिली.
हाजगोळी (ता. आजरा) चे माजी सरपंच रवींद्र जाधव हे सध्या आजरा साखर कारखान्यात जनसंपर्क अधिकारी पदावर आहेत. त्यांच्या लोणीकंद (पुणे) येथील मुलाकडे जाण्यासाठी जाधव हे शुक्रवारी रात्री कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानकात आले. स्टँडशेजारील थांबलेल्या रिक्षातून अज्ञात २५ वर्षीय युवक बाहेर आला, त्याने थेट जाधव यांना चाकूचा धाक दाखवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या खिशातील अडीच हजारांची रोकड असलेले पाकीट, मोबाइल चोरून पलायन केले.
दरम्यान, केदार घोडके हे पुण्यातील एका कंपनीत नोकरीस असून ते कंपनीच्या कामासाठी कोल्हापुरात आले होते. काम अटोपते घेऊन पुण्याला जाण्यासाठी रात्री रिक्षाने कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक चौकात आले. तेथे भाडे आकारणीवरून त्यांचा रिक्षाचालकाशी वाद झाला. रिक्षाचालकांसह तेथे थांबलेल्या अनोळखी तिघांनी घोडके यांच्याशी झटापट करून त्यांच्याडील लॅपटॉपची बॅग तसेच चांदीचे कडे, सोन्याची अंगठी, मोबाइल व दोन हजारांची रोकड असा सुमारे ३८ हजारांचा मुद्देमाल हिसकावून रिक्षातून पलायन केले.
स्टँडवर पुन्हा लुटमारीचे प्रकार
गेल्या काही महिन्यांत कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रवाशांना लुटण्याचे प्रकार थांबले होते; पण शुक्रवारी रात्री उशिरा एकट्या प्रवाशांना गाठून मारहाण करून त्यांना लुटण्याचे प्रकार घडल्याने पोलिसांनी झोप उडाली आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांचे पथक स्टँड परिसरात गस्तीसाठी असते की नाही, असा सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे.