रक्षा विसर्जनासाठी आलेल्यांवर मधमाशांचा हल्ला; शंभराहून अधिक जखमी, दहाहून अधिक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 20:29 IST2026-04-15T20:29:02+5:302026-04-15T20:29:32+5:30
आज सकाळी दहाच्या सुमारास येळवडेतील एका व्यक्तीचे रक्षाविसर्जन करण्यासाठी स्मशानभूमीमध्ये लोक जमा झाले होते.

रक्षा विसर्जनासाठी आलेल्यांवर मधमाशांचा हल्ला; शंभराहून अधिक जखमी, दहाहून अधिक गंभीर जखमी
- अमर मगदूम
राशिवडे : येळवडे ( ता. राधानगरी ) येथे रक्षाविसर्जन करण्यासाठी गेलेल्या लोकांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात शंभरहून अधिक लोक जखमी झाले. आज सकाळी दहा वाजता स्मशानभूमी शेजारील नारळाच्या झाडावरील मधमाशांनी रक्षाविसर्जनासाठी आलेल्यावर हल्ला चढवला. यात शंभराहून अधिक लोक जखमी झाले. यापैकी दहा ते बारा लोकांना प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सीपीआर व खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
आज सकाळी दहाच्या सुमारास येळवडेतील एका व्यक्तीचे रक्षाविसर्जन करण्यासाठी स्मशानभूमीमध्ये लोक जमा झाले होते. नैवेद्य दाखवून कावळा शिवण्याची वाट पहात असताना बाजूलाच असलेल्या नारळाच्या पानांवरील मधमाशीच्या पोळ्याला कावळ्याचा धक्का लागताच आक्रमक झालेल्या मधमाशांनी रक्षा विसर्जनासाठी आलेल्या लोकांवर हल्ला चढवला. भितीने लोक सैरावैरा पळत सुटले. मात्र तिथे उपस्थित असलेल्या शंभर व लोकांवर हल्ला केला. काहीनी शेजारी असलेल्या पोल्ट्रीमध्ये आश्रय घेतल्याने ते बचावले. जखमींवर राशिवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असुन गंभीर जखमींवर सीपीआर रुग्णालय कोल्हापूर आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान राशिवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात एकाच वेळी शंभराहून अधिक लोक दाखल झाल्याने गोंधळ उडाला. जिल्हा परिषद सदस्य सागर धुंदरे यांनी तातडीने उपाययोजना राबवत अधिकाऱ्यांना सुचना केल्या तर आरोग्य अधिकारी डॉ सायली पाटील यांनी गंभीर जखमींना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.