Kolhapur: संधीसाधू कोण आहे, हे सर्व जनतेला ठाऊक; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला हसन मुश्रीफांचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 12:07 IST2025-11-25T12:06:04+5:302025-11-25T12:07:01+5:30
'समरजित यांच्या बरोबर युती नव्हे, आघाडी

Kolhapur: संधीसाधू कोण आहे, हे सर्व जनतेला ठाऊक; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला हसन मुश्रीफांचे प्रत्युत्तर
गडहिंग्लज : गेली २० वर्षे मी ''गडहिंग्लज''चा आमदार आहे. त्यामुळे येथील लोकांची माझी चांगली ओळख आहे, शहरातील प्रश्नांची मला माहिती आहे. त्या सर्व प्रश्नांची निर्गत माझ्या हातूनच व्हावी, यासाठी शहरातील जनता आसुसलेली आहे. आतापर्यंत ज्यांच्याकडे नगरपालिकेची सत्ता होती, त्यांनी काय केले ? हेही लोकांना माहीत आहे. त्यामुळे तत्त्वाला तिलांजली देऊन युती केलेला ''जनता दल'' ''संधीसाधू'' की आम्ही हे सूज्ञ जनतेला चांगलेच ठाऊक आहे, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथील ''महायुती''च्या प्रचार दौऱ्यात कागल आणि चंदगड विधानसभा मतदारसंघातील ''राष्ट्रवादी''च्या भूमिकेचा दाखला दिला, असे ''संधीसाधू राजकारण जिल्ह्यात फार काळ चालणार नाही, असे विधानही केले आहे. परंतु, त्यांच्या टिप्पणीचे खंडन करताना मुश्रीफ यांनी आपला पारंपरिक विरोधक राहिलेल्या जनता दलाच्या बदललेल्या भूमिकेकडे अंगुलीनिर्देश केला.
मुश्रीफ म्हणाले, ''राजर्षी शाहू ग्रुप''चे प्रमुख समरजित घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याशी आघाडी करून आम्ही कागल पालिकेची निवडणूक लढवत आहोत. शक्य तिथे ''महायुती'' म्हणून आणि शक्य नाही तिथे ''आघाडी'' करून निवडणुकीला सामोरे जायचे, एकमेकांत भांडण करायचे नाही, असे आमचे राज्यपातळीवरच ठरले आहे.
तिन्ही शहरांचा मीच आमदार
राज्याची ''तिजोरी आमच्याकडे'' आहे असे आम्ही म्हटल्यानंतर ''तिजोरीचे मालक'' आम्ही आहोत असे त्यांनी म्हटले आहे. परंतु, कागलसह मुरगूड व गडहिंग्लजचा आमदार मीच आहे, या तिन्ही शहरातील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक आणि सर्वांगीण विकास आपणच करणार आहोत, असेही मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.