Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti: पुण्यानंतर शंभूराजेंचा पूर्णाकृती पुतळा साकारला कोल्हापुरात, कुठं आहे पुतळा..वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 14:28 IST2026-05-14T14:28:04+5:302026-05-14T14:28:33+5:30
बावड्यातही उभारला जातोय पुतळा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti: पुण्यानंतर शंभूराजेंचा पूर्णाकृती पुतळा साकारला कोल्हापुरात, कुठं आहे पुतळा..वाचा सविस्तर
भरत बुटाले
कोल्हापूर : कोल्हापूर हे नेहमीच इतिहासाच्या जतन आणि संवर्धनाबाबत जागरूक असते. कादंबरी, पुस्तके, शिल्पाकृती, तैलचित्रे आदी माध्यमातून याला उजाळा दिला जात आहे. रुईकर कॉलनीतील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा त्याचाच एक भाग. दगडी बांधकामातून तयार केलेल्या गडाच्या प्रतिकृतीवर हा पुतळा दिमाखात उभा आहे. पश्चिम महाराष्ट्रात उभारलेल्या शंभूराजांच्या पुतळ्यांपैकी पहिल्या काही पुतळ्यांमध्ये याचा समावेश होतो.
महापालिकेने उभारलेला हा पुतळा एस. बी. परदेशी यांनी साकारला आहे. तत्कालीन कुलगुरू डॉ. के. बी. पवार यांच्या हस्ते १७ मार्च १९९० ला अनावरण झाले. या पुतळ्यासाठी तत्कालीन खासदार उदयसिंगराव गायकवाड, रत्नाप्पाण्णा कुंभार, माजी महापौर रघुनाथ बावडेकर, उपमहापौर उदय पोवार, प्रकाश बोंद्रे, गौतम जाधव यांनी पुढाकार घेतला होता. २०१३ पासून आजतागायत येथील शिवशक्ती प्रतिष्ठानतर्फे या पुतळ्याची देखभाल केली जाते. २०१४ मध्ये प्रतिष्ठानतर्फे या शिल्पाकृतीची शास्त्रीय पद्धतीने रंगरंगोटी करण्यात आली.
रायगडावरील होळीच्या माळावर शिवरायांच्या पुतळ्यावर जसे छत्र आहे, त्याच पद्धतीचे छत्र बनवून येथील पुतळ्यावर बसविले आहे. पाच ते सहा वर्षांतून एकदा छत्राची देखभालदुरुस्ती आणि रंगरंगोटी केली जाते. या स्मारक परिसरात ऐतिहासिक माहिती सांगणारा फलकही आहे. स्मारक परिसराची सफाई, पूजन, महिन्याला ध्वज बदलणे, नववर्षाच्या प्रारंभी परिसराची स्वच्छता, त्रिपुरारीला दीपोत्सव, राज्याभिषेक दिन, जयंती, रक्तदान शिबिर आदी उपक्रम राबविले जातात. हे उपक्रम प्रतिष्ठानचे सदस्य स्वखर्चाने करतात. अशी माहिती प्रतिष्ठानचे साताप्पा कडव यांनी दिली.
पापाची तिकटी येथे शिल्पाकृती
पापाची तिकटी येथील मावळ्यांसह छत्रपती संभाजी महाराज यांची शिल्पाकृती सर्वांचेच लक्ष वेधून घेते. हा पुतळा किशोर पुरेकर यांच्या कलाकुसरीतून साकारला आहे. डिसेंबर २०२३ मध्ये अनावरण झाले.
रवींद्र पेंटर यांनी डॉ. जयसिंगराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजी महाराजांचे तैलचित्र तयार केले असून, त्याच्या लाखो प्रती राज्यभर पोहोचविण्याचा संकल्प असल्याची माहिती इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी दिली.
बावड्यातही उभारला जातोय पुतळा
कोल्हापुरातील कसबा बावडा येथील शुगर मिल चौकात आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निधीतून शंभूराजांच्या पुतळ्याची उभारणी सुरू आहे. १९ फूट उंच चौथऱ्याचे काम पूर्णत्वाकडे जात असून, त्यावर १६ फूट उंच पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील संगम माहुली येथील महाराणी येसूबाई यांच्या समाधीच्या धर्तीवर चौथरा तयार केला आहे.