दारू पिण्यासाठी पाणी दिले नाही, रागातून एकास मारहाण; कोल्हापुरातील घटना

By उद्धव गोडसे | Updated: June 5, 2024 12:45 IST2024-06-05T12:41:31+5:302024-06-05T12:45:20+5:30

सराईत गुंडासह तीन सख्ख्या भावांची दहशत, गुंड वसिम मलिक यास अटक

a person was beaten up for not giving water to drink In Yadav Nagar in Kolhapur | दारू पिण्यासाठी पाणी दिले नाही, रागातून एकास मारहाण; कोल्हापुरातील घटना

दारू पिण्यासाठी पाणी दिले नाही, रागातून एकास मारहाण; कोल्हापुरातील घटना

कोल्हापूर : यादवनगरातील पांजरपोळ परिसरात दारू पिण्यासाठी पाणी न दिल्याच्या रागातून तिघांनी कल्लाप्पा कल्लोळी कु-हाडे (वय ४५, रा. १४ वी गल्ली, राजारामपुरी) यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून बेदम मारहाण केली. हा प्रकार सोमवारी (दि. ३) सायंकाळी पाचच्या सुमारास लक्ष्मीनारायण फॅब्रिकेशन येथे घडला. 

याबाबत कु-हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजारामपुरी पोलिसांनी सराईत गुंड राजकुमार वसिम मलिक (वय २८) याच्यासह त्याचे सख्खे भाऊ विपूल आणि मीलन (तिघे रा. उजळाईवाडी, ता. करवीर) या तिघांवर गुन्हा दाखल केला. यातील राजकुमार मलिक याला पोलिसांनी अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, उजळाईवाडी येथील सराईत गुंड राजकुमार मलिक आणि त्याचे दोन भाऊ सोमवारी सायंकाळी यादवनगरातील पांजरपोळ येथे लक्ष्मीनारायण फॅब्रिकेशनसमोर दारू पित बसले होते. यातील एकाने फॅब्रिकेशनमध्ये जाऊन पाणी मागितले. मात्र, फॅब्रिकेशनमधील कर्मचारी कु-हाडे यांनी पाणी भरले नसल्याचे सांगत पाणी देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने मलिक बंधूंनी कु-हाडे यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्यांना मारहाण केली. परिसरातील नागरिकांची गर्दी जमताच तिन्ही गुडांनी पळ काढला. 

यातील राजकुमार मलिक हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुंड असून, त्याच्यावर मारामारी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, दहशत माजवण्याचे गुन्हे दाखल आहेत. फिर्याद दाखल होताच राजारामपुरी पोलिसांनी त्याला अटक केली.

Web Title: a person was beaten up for not giving water to drink In Yadav Nagar in Kolhapur