‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 14:37 IST2026-04-26T14:37:37+5:302026-04-26T14:37:37+5:30
Harbhajan Singh News: हरभजन सिंग यांच्या निवासस्थानाबाहेर काळ्या रंगाने 'पंजाबचा गद्दार' असे शब्द लिहिण्यात आले होते.

‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
Harbhajan Singh News: आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतील १० पैकी ७ खासदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे आप आमदी पक्षाला खूप मोठा राजकीय धक्का बसला. आप खासदार राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासह सात जणांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यामध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू हरभजन सिंग यांचाही समावेश आहे. परंतु, यानंतर आता पंजाब सरकारने दणके देण्यास सुरुवात केल्याचे समोर येत आहे. हरभजन सिंग यांची सुरक्षा काढली आहे.
हरभजन सिंग यांचे स्वीय सहाय्यक मनदीप सिंग यांनी सांगितले की, पंजाब सरकारने अचानक कारवाई करत त्यांची संपूर्ण पोलीस सुरक्षा काढून घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरभजन सिंग यांच्या घराबाहेर तैनात असलेले सुमारे नऊ ते दहा सुरक्षा कर्मचारी हटवण्यात आले असून, त्यांना देण्यात आलेली सरकारी पायलट कारही परत घेण्यात आली आहे. हरभजन सिंग यांनी या घटनाक्रमांवर आतापर्यंत मौन बाळगले असले तरी, सुरक्षा काढून घेणे हा सरकारच्या नाराजीचा स्पष्ट संकेत मानला जात आहे.
काळ्या रंगाने 'पंजाबचा गद्दार' असे शब्द लिहिण्यात आले
तत्पूर्वी, शनिवारी सकाळी हरभजन सिंग यांच्या निवासस्थानाबाहेर काळ्या रंगाने 'पंजाबचा गद्दार' असे शब्द लिहिण्यात आले होते. काही लोक 'गद्दार' असे स्प्रे-पेंट करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. पोलीस जवळच उभे असूनही, त्यांना हटवण्यासाठी ते कोणताही विशेष प्रयत्न करत असल्याचे दिसले नाही. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळ्या पट्ट्या बांधून निषेध नोंदवला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पक्ष सोडून गेलेल्या खासदारांना 'देशद्रोही' संबोधत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. चंदीगड येथे एका पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, या नेत्यांनी केवळ पक्षाचाच नव्हे, तर पंजाबच्या जनतेच्या विश्वासाचाही विश्वासघात केला आहे.
दरम्यान, भगवंत मान यांनी असा आरोप केला आहे की, भाजपाला पंजाब आणि पंजाबी लोकांशी समस्या आहे. त्यांच्या पंजाबच्या लोकांच्या हिताच्या कोणत्याही गोष्टीत भाजपा अडथळा आणण्याचा प्रयत्न करते. आम आदमी पक्ष ही कोणत्याही एका व्यक्तीपेक्षा मोठा आहे. काही लोकांच्या जाण्याने पक्षावर किंवा पंजाबच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही.