दररोज २१ एमएलडी सांडपाणी कोल्हापुरात विनाप्रक्रिया पंचगंगेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 06:00 AM2019-12-16T06:00:06+5:302019-12-16T06:00:29+5:30

जलचरांना मोठा फटका : शहर व परिसरातील नागरिकांसोबत शेतीचेही आरोग्य बिघडले, देशातील १० प्रदूषित नद्यांमध्ये पंचगंगेचा समावेश

21 MLD wastewater daily in Kolhapur panchganga river without processing | दररोज २१ एमएलडी सांडपाणी कोल्हापुरात विनाप्रक्रिया पंचगंगेत

दररोज २१ एमएलडी सांडपाणी कोल्हापुरात विनाप्रक्रिया पंचगंगेत

Next


नसीम सनदी।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : न्यायालयाने सातत्याने फटकारल्यानंतरही कोल्हापूर शहरातील २१ एमएलडी सांडपाणी दररोज विनाप्रक्रिया थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. त्याचा फटका माणसांसोबतच शेती आणि जलचरांना बसत आहे.
देशातील १० प्रदूषित नद्यांमध्ये पंचगंगेचा समावेश होतो. या प्रदूषणात कोल्हापूर शहराचा वाटा सर्वाधिक आहे. या प्रदूषणावरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पन्नासवर नोटिसा काढल्या आहेत. तरीही दुर्लक्ष केल्याने अखेर उच्च न्यायालयानेच कान टोचले. तेव्हा कुठे सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभा राहिला. शिंगणापूर, बालिंगा, नागदेववाडी या तीन पम्पिंग स्टेशनमधून प्रतिदिन १३० एमएलडी पाण्याचा उपसा केला जातो. शहरातील १२ नाल्यांतून आलेल्या ९५ एमएलडी सांडपाण्यावर दुधाळी, बापटकॅम्प, लाईन बाजार येथील केंद्रांवर प्रक्रिया केली जाते. या प्रकल्पासाठी ७८ कोटींचा खर्च झाला आहे; पण अजूनही ते पूर्ण क्षमतेने चालवले जात नाही. त्यामुळे २१ एमएलडी पाणी थेट नदीत मिसळते. यामुळे माणसांसोबतच जलचर आणि जैवविविधतेलाही फटका बसत आहे. हिरवा तवंग आणि जलपर्णीमुळे नदीच्या पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होऊन जलचर गुदमरून मरण पावतात. या खोऱ्यातील मासेमारी आता संपल्यातच जमा आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नेमलेल्या निरी समितीने अहवाल दिल्यानंतर जिल्ह्यातील सहा औद्योगिक वसाहतींतील २२८० उद्योेगांवर सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करण्याचे निर्बंध घालण्यात आले. यामुळे त्यांचे सांडपाणी नदीत मिसळणे काही प्रमाणात बंद झाले आहे. तरी इतर ठिकाणांवरून येणारे सांडपाणी नदीतच सोडले जात आहे. शहराबरोबरच नदीकाठावरील १७४ गावांना प्रदूषणाची मोठ्या प्रमाणावर झळ बसत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने शासनाकडे १०८ कोटी रुपयांची मागणी केली होती; पण त्यालाही पाच वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यानंतर ९६ कोटींचा सुधारित प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी दिला. त्यालाही शासनाकडून प्रतिसाद मिळालेला नाही.


नदीशेजारी असूनही
टँकरने पाणी
कोल्हापूर शहरातून बाहेर पडणारे सांडपाणी पंचगंगेतून वाहत जाऊन नृसिंहवाडीला कृष्णा नदीला जाऊन मिसळते. कोल्हापूर ते नृसिंहवाडी या जवळपास ६० मीटरच्या पट्ट्यात पंचगंगा नदी प्रदूषणाचे अक्राळविक्राळ स्वरूप धारण करते. शहराने केलेल्या घाणीचा फटका या नदीकाठावरील जनतेला आणि शेतीलाही बसतो. नदीकाठावर राहूनदेखील तब्बल ३९ गावांतील लोकांना पिण्यासाठीच्या पाण्याची व्यवस्था टँकरद्वारे अथवा आरओ प्लान्टद्वारे करावी लागते.

शेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर
पंचगंगा खोºयातील करवीर, हातकणंगले आणि शिरोळ या तीन तालुक्यांतील शेतीला या प्रदूषणाची मोठी झळ बसत आहे. फेसाळलेल्या पाण्यामुळे या भागातील बहुतांश शेती क्षारपड होऊ लागली आहे. या भागात ऊस या प्रमुख पिकासह धान्य, कडधान्य आणि भाजीपाल्याची पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. मध्यंतरी शिरोळमध्ये पिकणाºया भाज्या खाल्ल्या तर कॅन्सर होतो, अशा अफवा होत्या. शिवाय दरवर्षी अतिसाराची साथ ठरलेलीच असते.

Web Title: 21 MLD wastewater daily in Kolhapur panchganga river without processing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.