"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 14:12 IST2025-10-01T14:09:32+5:302025-10-01T14:12:23+5:30
समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांनी भिवंडीत मराठी भाषा बोलण्यास नकार दिला.

"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
Abu Azmi on Marathi: राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करण्यावरुन झालेल्या वादानंतर मराठीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मराठीच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला धारेवर धरलं होतं. त्यानंतर मराठी न बोलण्यावरुन मनसैनिकांनी काही जणांचा चोप देखील दिला होता. त्यानंतर आता समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनीही मराठी बोलण्यास नकार दिला आहे. आझमींच्या वक्तव्यावरुन आता राजकीय वातावरण तापलं असून मनसेसह भाजपनेही त्यांना इशारा दिला आहे.
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या मराठी विरोधातील वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भिवंडीतील कल्याण रोडवरील रुंदीकरण थांबवण्याच्या मागणीसाठी अबू आझमी हे मंगळवारी भिवंडीत आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हिंदी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मात्र मराठी माध्यमांनी त्यांना मराठीत प्रतिक्रिया देण्यास सांगितले. यावर अबू आझमी यांनी मराठीत उत्तर देण्यास टाळाटाळ करत हिंदीमध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं.
मराठी हिंदीमध्ये फरक काय आहे? मी मराठीत बोलू शकतो. पण मराठीत बोलण्याची गरज काय? ही भिवंडी आहे, असं वादग्रस्त विधान अबु आझमी यांनी केले. आझमींच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसेने त्यांना प्रत्युत्तर दिलं. अबू आझमी तुम्ही महाराष्ट्रात राजकारण करता. महाराष्ट्रात राजकारण करत असताना उत्तर प्रदेशातील भय्याची तुम्हाला काळजी वाटते काय? भिवंडी महाराष्ट्रात आहे आणि इथे मराठीच चालणार आहे. तुम्हाला मराठी बोलायला लाज वाटत असेल तर तुम्हाला मनसे स्टाईल उत्तर देण्यात येईल, असा इशारा परेश चौधरी यांनी दिला.
ज्यांना मराठी भाषा आवडत नाही. त्यांनी महाराष्ट्र सोडून जावं. महाराष्ट्र म्हणून इथल्या भाषेचा पहिला सन्मान केला पाहिजे. हे लोक तर म्हणतात पाकिस्तान देखील चांगला आहे. पाकिस्तानसोबत सामना असला की यांच्याकडून एकही वक्तव्य येत नाही. मग यांच्याकडून काय अपेक्षा ठेवावी. अबू आजमी यांनी नवीन नवीन भानगडी करू नये. इथं मराठी भाषा पहिली आहे त्याच्याशी कोणी छेडछाड करू नये. नाहीतर अबू आजमी याना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा भाजप नेत्या नवनीत राणा यांनी दिला.