कल्याण पश्चिमेतील दोन फ्लॅटमध्ये आग, नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 19:45 IST2026-05-07T19:45:22+5:302026-05-07T19:45:38+5:30
या आगीत दोन फ्लॅटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले.

कल्याण पश्चिमेतील दोन फ्लॅटमध्ये आग, नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली
कल्याण: कल्याण पश्चिमेतील ऋतू रिव्हर व्ह्यू क्लासिक या बहुमजली इमारतीमध्ये गुरुवारी सकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. पाचव्या मजल्यावरील एका फ्लॅटमधील हॉलमध्ये बसवलेल्या एसीचा स्फोट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आगीत दोन फ्लॅटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले.
सकाळच्या वेळी अचानक एसीमध्ये स्फोट झाल्यानंतर काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. पाचव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये लागलेली आग अल्पावधीतच सहाव्या मजल्यापर्यंत पसरली. त्यात धुराचे लोट परिसरात दिसत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच कल्याण अग्निशामक विभागाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आग नियंत्रणात आणली. इमारतीमधील अग्निसुरक्षा यंत्रणा पूर्णपणे कार्यरत नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे आग विझवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत धाडसाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
काही रहिवाशांनी तत्काळ पाण्याच्या साहाय्याने आणि प्राथमिक साधनांचा वापर करून आगीचा इतरत्र पसरु नये यासाठी प्रयत्न केले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. आग लागली त्यावेळी संबंधित फ्लॅटच्या हॉलमध्ये कोणीही उपस्थित नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि इतर वस्तू जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेचा पुढील तपास अग्निशामक विभाग आणि खडकपाडा पोलीस करत आहेत.