वादळी वाऱ्यामुळे कल्याणमधील नौदल संग्रहालयाचे नुकसान, संग्रहालयाच्या कामाविषयी प्रश्चचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 18:47 IST2026-05-08T18:46:38+5:302026-05-08T18:47:13+5:30
केडीएमसी सभागृह नेते वरुण पाटी यांनी केली चौकशीची मागणी

वादळी वाऱ्यामुळे कल्याणमधील नौदल संग्रहालयाचे नुकसान, संग्रहालयाच्या कामाविषयी प्रश्चचिन्ह
कल्याण : कल्याणमध्ये गुरुवारी वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली. या वादळी वाऱ्याचा फटका कल्याण पश्चिमेतील खाडी किनारी उभारण्यात आलेल्या नौदल संग्रहालयाच्या वास्तूलाही देखील बसला आहे. त्याठिकाणी संग्रहालयाच्या बाह्य भागाच्या पाच शीट वाऱ्यामुळे कोसळून संग्रहालयाचे लोकार्पणा आधीच नुकसान झाले आहे. संग्रहालयाच्या कामाविषयी संशय व्यक्त करण्यात आला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेचे सभागृह नेते वरुण पाटील यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आराेप पाटील यांनी केला आहे. मात्र त्यांचे आरोप स्मार्ट सिटी प्रकल्प अभियंत्या रोहिणी लोकरे यांनी फेटाळून लावले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण खाडी परिसरात भुईकोट असलेल्या किल्ले दुर्गाडी किल्यावरी दुर्गाडी देवीच्या साक्षीने हिंदवी स्वराज्यासाठी मराठा आरमाराची स्थापना केली. त्याठिकाणी महापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पाणी बुडीच्या आकाराचे नौदल संग्रहालय उभारले आहे. या संग्रहालयास नौदल प्रशासनाकडून प्रमाण पत्र मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे या संग्रहालयाचे लोकार्पण रखडले आहे. हे प्रमाण पत्र येत्या तीन आठवड्यात मिळणे अपेक्षित असल्याचे कार्यकारी अभियंत्या लोकरे यांनी दोन दिवसापूर्वी सांगितले होते. त्याआधीच काल वादळी वाऱ्यामुळे संग्रहालयाच्या वास्तूच्या बाह्य भागाच्या पाच शीट काेसळून खाली पडल्या. या शीट पुन्हा कंत्राटदाराच्या मार्फत लावून घेतल्या जातील असेही लोकरे यांनी सांगितले असले तरी या केलेल्या कामाविषयी सभागृह नेते पाटी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यांची मागणी ग्राह्य धरुन आयुक्त या प्रकरणी चाैकशी लावतात की नाही ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.