बंद मंदिरांना वीज बिलांचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:21 IST2021-09-05T04:21:07+5:302021-09-05T04:21:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना काळात देऊळ बंद करण्यात आले आहे. तरीही तेथे पुजारी नित्यनेमाने पूजाअर्चा करीत आहेत. ...

Shock of electricity bills to closed temples | बंद मंदिरांना वीज बिलांचा शॉक

बंद मंदिरांना वीज बिलांचा शॉक

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना काळात देऊळ बंद करण्यात आले आहे. तरीही तेथे पुजारी नित्यनेमाने पूजाअर्चा करीत आहेत. त्यासोबतच विविध सणदेखील मंदिरांमध्ये भाविकांच्या अनुपस्थितीतच साजरे केले जात आहेत. त्यामुळे शहरातील सर्वच प्रमुख मंदिरांना आता कोरोना काळात उत्पन्न कमी आणि वीज बिलांचा शॉक बसला आहे. ओंकारेश्वर मंदिरात वर्षाला सुमारे दोन लाख ४० हजार रुपयांपेक्षा जास्त वीज बिल आले आहे, तर उत्पन्न त्या प्रमाणात नाही. दर महिन्याला देणगीच्या रूपाने २५ ते ३० हजार रुपये मिळत आहेत. शहरातील इतर सर्व मंदिरांची अवस्था काही प्रमाणात अशीच आहे.

मार्च २०२० पासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लावण्यात आले. त्यात पहिला फटका बसला तो देवस्थानांना. मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा यांच्यात होणारी गर्दी पाहता प्रशासनाने देवस्थानांमध्ये भाविकांना प्रवेशास बंदी घातली. तेथे फक्त पुजारी जाऊनच धार्मिक विधी करतील, असे आदेश देण्यात आले. त्याचा परिणाम हा मंदिरांच्या उत्पन्नावर झाला. मंदिरांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत हा देणगी आहे. देणगीच घटल्याने मंदिरांचे उत्पन्न कमी झाले. मात्र, खर्च कमी झाला नाही. मंदिरांना सर्वांत जास्त खर्च हा विद्युत बिलांवर करावा लागतो. शहरातील ओंकारेश्वर मंदिरात सध्या श्रावण महिन्यात विद्युत रोषणाई केली जाते. दर वर्षीप्रमाणे यंदाही रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिरांचे उत्पन्न कमी आणि विजेचा खर्च जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे.

शहरातील ओंकारेश्वर मंदिरांमध्ये श्रावण महिन्यात आतापर्यंत सुमारे अडीच लाख रुपये देणगी गोळा झाली आहे, तर दर वर्षाचे वीज बिलच एवढ्या रकमेचे होत आहे. त्याव्यतिरिक्तदेखील इतर खर्च मंदिराच्या व्यवस्थापनाला नेहमी करावा लागतो.

कोट -

दरवर्षी श्रावण महिन्यात मिळणाऱ्या देणगीपेक्षा यंदा देणगी ७५ टक्क्यांनी कमी आली आहे, तसेच दर महिन्याला मिळणारी देणगीही घटली आहे. त्या तुलनेने खर्च मात्र फारसा कमी झालेला नाही. श्रावण महिन्यात मंदिरावर रोषणाई केली जाते. त्यामुळे विजेचे बिलदेखील वाढले आहे - जुगल किशोर जोशी, व्यवस्थापक

Web Title: Shock of electricity bills to closed temples