भाजप सोडून आलेल्या उन्मेष पाटलांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र! शिंदेसेनेत करणार प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 17:51 IST2026-03-03T17:44:14+5:302026-03-03T17:51:03+5:30

उन्मेष पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

Ex MP Unmesh Patil Quits Thackeray Camp to Join Shinde Shiv Sena | भाजप सोडून आलेल्या उन्मेष पाटलांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र! शिंदेसेनेत करणार प्रवेश

भाजप सोडून आलेल्या उन्मेष पाटलांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र! शिंदेसेनेत करणार प्रवेश

Unmesh Patil: जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महत्त्वाचे नेते आणि माजी खासदार उन्मेष पाटील यांनी मशाल सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शुक्रवारी, ६ मार्च रोजी मुंबईत आपल्या शेकडो समर्थकांसह ते अधिकृतपणे शिंदेसेनेत प्रवेश करतील.

राजकारणातील 'यू-टर्न': भाजप ते शिवसेना (शिंदे)
उन्मेष पाटील यांचा राजकीय प्रवास गेल्या दोन वर्षांत अत्यंत नाट्यमय राहिला आहे. २०१९ मध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघातून ४ लाखांहून अधिक विक्रमी मताधिक्याने विजयी होणाऱ्या पाटील यांना २०२४ मध्ये भाजपने उमेदवारी नाकारली होती. नाराजीमुळे भाजपला रामराम ठोकून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि बदललेली राजकीय समीकरणे पाहता, अवघ्या काही महिन्यांतच त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची सोबत सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून उन्मेष पाटील महायुतीच्या नेत्यांच्या संपर्कात होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीत खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली होती. सोमवारी त्यांनी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन स्थानिक राजकारणावर चर्चा केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काम करण्याची धडाकेबाज पद्धत आवडल्यामुळेच हा निर्णय घेतल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. "एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जनतेची कामे करणे सोपे होईल. विकास आणि प्रगतीसाठी मी हा निर्णय घेतला आहे," अशी प्रतिक्रिया उन्मेष पाटील यांनी दिली आहे.

ठाकरे गटाला जळगावात मोठे खिंडार

जळगाव जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनीही या प्रवेशाच्या वृत्ताला दुजोरा दिला. एकेकाळी वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती असल्याची टीका करणाऱ्या पाटील यांनी आता पुन्हा एकदा महायुतीमध्ये जाणे पसंत केले आहे. यामुळे चाळीसगावसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद कमी झाली आहे.

२०१४ साली चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार म्हणून उन्मेष पाटील विजयी झाले होते. २०१५-१९ मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष होते. २०१९ मध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने खासदार म्हणून निवडून आले. २०२४ मध्ये त्यांनी भाजप सोडून शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश केला मात्र विधानसभा निवडणुकीत पराभव पाटील यांचा पराभव झाला.
 

Web Title : उन्मेष पाटिल ने उद्धव का साथ छोड़ा, शिंदे सेना में शामिल, राजनीतिक यू-टर्न।

Web Summary : पूर्व भाजपा सांसद उन्मेष पाटिल ने उद्धव ठाकरे की शिवसेना छोड़कर एकनाथ शिंदे गुट का दामन थामा। भाजपा द्वारा उम्मीदवारी से वंचित किए जाने पर वे पहले ठाकरे में शामिल हुए, लेकिन शिंदे के प्रभावी शासन का हवाला देते हुए गठबंधन बदल दिया। इस कदम से जलगांव में ठाकरे समूह कमजोर होगा।

Web Title : Unmesh Patil deserts Uddhav, joins Shinde's Sena, a political U-turn.

Web Summary : Unmesh Patil, former BJP MP, left Uddhav Thackeray's Shiv Sena to join Eknath Shinde's faction with supporters. Disappointed by BJP's denial of candidacy, he initially joined Thackeray, but shifted alliances citing Shinde's effective governance. This move weakens Thackeray's group in Jalgaon.