अर्थिक चक्राला गती मिळण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 11:27 AM2020-06-06T11:27:27+5:302020-06-06T11:27:40+5:30

बाजारपेठ ‘अनलॉक’: सकाळपासून उसळली गर्दी, मास्क, सॅनिटायझेशनसह सुरक्षेबाबत दक्षता

The economic cycle begins to gain momentum | अर्थिक चक्राला गती मिळण्यास सुरुवात

अर्थिक चक्राला गती मिळण्यास सुरुवात

Next

जळगाव : लॉकडाऊन पाचमध्ये शिथिलता देण्याच्या दुसऱ्या टप्प्यात ५ जूनपासून मॉल्स व संकूल वगळता इतर दुकाने अडीच महिन्यांनंतर पुन्हा सुरू झाली असून बाजारपेठेत सकाळपासूनच गर्दी होऊन ग्राहकांनी खरेदी केली. कापड, हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीक वस्तूंच्या दुकानांसह शहरातील सुवर्णबाजारदेखील सुरू झाला. सुवर्णबाजार सुरू होताच ग्राहकदेखील सुवर्णपेढ्यांकडे वळले असून पहिल्या दिवशी खरेदीस मोठा प्रतिसाद मिळाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत व्यावसायिकांकडून ग्राहकांना सूचना देण्यासह दुकानांमध्येही दक्षता घेतली जात होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्चपासून लॉकडाऊन असल्याने जीवनाश्वयक वस्तूंच्या दुकान वगळता शहरातील इतर व्यवहार बंद होते. त्यामुळे व्यापारनगरी जळगावचे अर्थचक्र थबकले होते. मात्र आता लॉकडाऊन पाचमध्ये हळूहळू शिथिलता दिली जात असून याच्या दुसºया टप्प्यात ५ जूनपासून शहरातील मॉल्स, संकूल वगळता इतर दुकाने सुरू झाली.
तसे लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शिथिलता देत ४ मेपासून दुकाने सुरू करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र मनपा क्षेत्र रेडझोनमध्ये असल्याने व शहरात रुग्ण संख्या वाढतच असल्याने पुन्हा दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
यामध्ये ही दुकाने बंद करण्याच्या निर्णयापूर्वीच जळगाव सराफ व्यावसायिक असोसिएशनने स्वत: पुढाकार घेत सुवर्णपेढ्या बंद करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या महिन्यात मद्य विक्रीची दुकानेदेखील सुरू झाली होती. मात्र तेथील गर्दी पाहता तीदेखील बंद करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे पुन्हा बाजारपेठ ठप्प झाली होती.
सम-विषम पद्धतीने दुकाने उघडली जात असल्याने ग्राहक ज्या दुकानावर आला ते दुकान बंद राहिल्यास त्याला परत जावे लागत आहे. यामुळे ग्राहकांमध्ये काहीसा गोंधळ होत असून सम-विषम पद्धतीने दुकाने न उघडता सरसकट दररोज सर्व दुकाने उघडण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी होत आहे.

बाजार संकुलात मात्र चिंता कायम
दुकाने सुरू करण्याची परवागी मिळाली असली तरी शहरातील मुख्य बाजारपेठ ठरणारे महात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, गोलाणी मार्केट, महात्मा गांधी मार्केट, बी.जे. मार्केट, नाथ प्लाझा, छत्रपती शाहू महाराज मार्केट हे अद्यापही बंद आहेत. त्यामुळे शहरातील ही प्रमुख बाजारपेठच बंद असल्याने तेथील व्यावसायिक चिंतेत आहेत.काही जण दुकानाबाहेर थांबून असल्याचे चित्र दिसत होते.

व्यावसायिकांकडून दक्षता
दुकाने सुरू झाली असली तरी नियमांचे पालन करण्याची जबाबदारी दुकानदारांवर सोपविण्यात आल्याने व्यावसायिकही ही काळजी घेत आहेत. लॉकडाऊननंतर दुकाने सुरू होताच व्यावसायिकांनी आपापली दालने सॅनिटाईज करून स्वत:सह ग्राहकांची काळजी घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोना संसर्गापासून बचाव होऊन ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक ग्राहकाला मास्कचा वापर करण्यासाठी आवाहन केले जात आहे. तसेच दुकानांमधील कर्मचाऱ्यांसाठी हॅण्ड ग्लोजचा वापर, एकावेळी दुकानात मोजक्याच ग्राहकांना प्रवेश, सोशल डिस्टसिंगचे पालन अशी खबरदारी व्यावसायिकांकडून घेतली जात असल्याचे चित्र पहिल्या दिवशी बाजारपेठेत राहिले. संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच दुकानांना वेळ असल्याने संध्याकाळनंतर बाजारपेठेत शांतता होती.

व्यावसायिकांमध्ये समाधान
कोरोनामुळे अडीच महिन्यांपासून शहरातील आर्थिक गती मंदावली होती. आता दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने सर्वच व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले असून आर्थिक घडी बसविण्यासाठी कोरोना असला तरी काळजी घेऊ, असा मनोदय व्यक्त करीत स्वत:सह कर्मचाºयांसाठी व्यवहार सुरू राहणे गरजेचे असल्याच्या भावना व्यक्त केल्या. यामुळे शहराच्या अर्थकारणालाही गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शुक्रवारी सुरू असलेली दुकाने आज बंद
अनलॉकच्या दुसºया टप्प्यात दुकाने सुरू करताना ती सम विषम पद्धतीने सुरू करण्याचे आदेश आहे. त्यामुळे शहरातील उत्तर आणि पश्चिम बाजूकडील दुकाने विषम तर दक्षिण आणि पूर्व बाजूकडील दुकाने सम दिनांकास उघडी राहणार आहेत. त्यामुळे ५ जून रोजी उघडी असणारी दुकाने आता ६ रोजी बंद राहणार असून ६ जून रोजी दक्षिण आणि पूर्व बाजूकडील दुकाने सुरू राहणार आहेत.

सुवर्णबाजार सुरू होताच ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी ग्राहक खरेदीसाठी वळले. सुरक्षेच्या दृष्टीने सर्वांना सूचना देण्यात आल्या. गर्दी न करता अनेक जण थांबून प्रतीक्षा करीत होते.
- सुशील बाफना,
सुवर्ण व्यावसायिक

Web Title: The economic cycle begins to gain momentum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.