जालन्यात चालकाला डुलकी लागल्याने टँकर उलटला; हजारो लिटर खाद्यतेलाचा रस्त्यावर पूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 12:14 IST2026-05-05T12:12:39+5:302026-05-05T12:14:09+5:30
जालन्यात कंकणेश्वर पाटीजवळ तेलाचा टँकर उलटला; पोलिसांची घटनास्थळी धाव

जालन्यात चालकाला डुलकी लागल्याने टँकर उलटला; हजारो लिटर खाद्यतेलाचा रस्त्यावर पूर
जालना: जालना शहरातील नाव्हा चौफुली आणि कंकणेश्वर पाटी परिसरात सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. तेल वाहतूक करणाऱ्या एका मोठ्या टँकरच्या चालकाला डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टँकर रस्त्याच्या कडेला उलटला. टँकर उलटल्यामुळे त्यातील हजारो लिटर खाद्यतेल रस्त्यावर सांडले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. हा टँकर नेमका कुठून कुठे जात होता, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. टँकर उलटल्यानंतर रस्त्यावर तेल सांडल्याने इतर वाहनधारकांची घसरगुंडी होऊ नये, यासाठी पोलीस खबरदारी घेत आहेत.