ड्रायपोर्टमुळे 'बूस्ट'; जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावर आणखी रेल्वेस्थानक सेवेत येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 13:35 IST2026-04-25T13:28:26+5:302026-04-25T13:35:50+5:30
माल वाहतुकीसह प्रवासी वाहतुकीसाठीदेखील हे रेल्वे स्थानक उपयोगी ठरणार आहे.

ड्रायपोर्टमुळे 'बूस्ट'; जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावर आणखी रेल्वेस्थानक सेवेत येणार
- शिवाजी कदम
जालना :जालना ते छत्रपती रेल्वे मार्गावर दिनेगाव हे रेल्वे स्थानक लवकरच सेवेत येणार आहे. काही वर्षांपूर्वी प्रवासी संख्येअभावी हे स्थानक बंद करण्यात आले होते. आता जालना येथील ड्राय पोर्ट लवकरच कार्यान्वित होणार असल्याने या स्थानकावरून रेल्वे वाहतूक सुरू होणार आहे. माल वाहतुकीसह प्रवासी वाहतुकीसाठीदेखील हे रेल्वे स्थानक उपयोगी ठरणार आहे. दिनेगाव ते ड्राय पोर्ट दरम्यानच्या साडेतीन किलोमीटर रेल्वे मार्गावर बुधवारी डिझेल इंजिनची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या ट्रायलमुळे जालना ड्राय पोर्ट प्रत्यक्ष कार्यान्वित होण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
रेल्वे रुळांची मजबुती, वळणे, सिग्नलिंग यंत्रणा आणि सुरक्षा मानकांची काटेकोर तपासणी करणे हा या चाचणीचा मुख्य उद्देश होता. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. ड्राय पोर्ट सुरू होण्यापूर्वीचा हा एक अत्यंत महत्त्वाचा तांत्रिक टप्पा मानला जात आहे.
१ मे रोजी उद्घाटनाची शक्यता
जालना जिल्ह्याच्या वैभवात भर टाकणाऱ्या या ड्राय पोर्टचे उद्घाटन येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून करण्याचे प्रस्तावित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडण्याची शक्यता असून, अद्याप अधिकृत कार्यक्रमाची घोषणा झाली नसली तरी प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी सुरू आहे.
आयात-निर्यातीला येणार मोठे उधाण
जालना शहराजवळील दरेगाव येथे ४९५ एकर जागेवर जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड यांनी संयुक्तपणे हे ड्राय पोर्ट विकसित केले आहे. येथे कंटेनर यार्ड, वेअर हाऊस आणि लिफ्टिंग टर्मिनस यासारख्या अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासाठी दिनेगाव रेल्वे स्थानकाचा वापर होणार आहे.
दिनेगाव रेल्वे स्थानकाचे उजळणार भाग्य!
सध्या दिनेगाव रेल्वे स्थानकावर एकही पॅसेंजर रेल्वे थांबत नाही. कारण, आजूबाजूला मोठी वस्ती नाही. मात्र, ड्राय पोर्ट सुरू झाल्यानंतर या स्थानकाचे महत्त्व प्रचंड वाढणार आहे. भविष्यात येथे गाड्या थांबतील आणि स्थानिक नागरिक रोजगारासाठी येथून जालन्याला ये-जा करू शकतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.