"अमेरिकेला इराणवर हल्ले करण्यासाठी आमची जमीन वापरू देणार नाही", यूएईची रोखठोक भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 10:28 IST2026-03-13T10:25:53+5:302026-03-13T10:28:37+5:30
UAE on Iran Israel War: अमेरिका-इस्रायलने सुरू केलेल्या युद्धाचे तडाखे इराणच्या शेजारी देशांनाही बसू लागले आहेत. इराणकडून होत असलेल्या हल्ल्यानंतर संयुक्त अरब अमिरातीने स्पष्ट भूमिका मांडली आहे.

"अमेरिकेला इराणवर हल्ले करण्यासाठी आमची जमीन वापरू देणार नाही", यूएईची रोखठोक भूमिका
UAE Stand on Iran War: अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर सुरू असलेल्या हल्ल्यांच्या दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) स्पष्ट भूमिका मांडत अमेरिकेला मेसेज दिला आहे. इराणकडून आखाती देशांमध्ये होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध करत अमेरिकेला संयुक्त अरब अमिरात हल्ले करण्यासाठी आपली जमीन वापरू देणार नाही, अशी भूमिका यूएईच्या राज्यमंत्री लाना नुसेबेहर यांनी मांडली आहे.
राज्यमंत्री लाना नुसेबेह म्हणाल्या की, इराणकडून आखाती देशांमध्ये होत असलेले हल्ले बेकायदेशीर आणि कोणत्याही कारणाशिवाय केले गेले आहेत. हल्ल्यांना मर्यादाच राहिलेली नाही. महत्त्वाचं म्हणजे इराणने संपूर्ण भागालाच या युद्धा ओढून घेतले आहे.
यूएई इराणवर हल्ले करणार का?
इराणकडून होत असलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून संयुक्त अरब अमिराती इराणवर हल्ले करणार का? असा प्रश्नही लाना नुसेबेह यांना विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या की, 'पुढे जाण्याचा मार्ग कूटनीतीच असायला हवा. यूएईला स्वतःचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे. पण अमेरिकेला इराणवर हल्ले करण्यासाठी यूएई आपली भूमी किंवा हवाई हद्द वापरू देणार नाही.'
"यूएईची अर्थव्यवस्था मजूबत आहे आणि तेलाच्या ठिकाणांवर आणि पर्यटन उद्योगावर झालेले हल्ले सहन करू शकते. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि काही हॉटेल्सवरही हल्ले झाले आहेत", असे त्या म्हणाल्या.
इराणने आखाती देशातील हल्ले थांबवावेत
लाना नुसेबेह म्हणाल्या की, इराणने आखातात असलेल्या देशांवरील हल्ले थांबवायला हवेत. आतापर्यंत १८०० ड्रोन्स आणि मिसाईल्स यूएईने आकाशात नष्ट केल्या आहेत.
यूएईतील प्रसिद्ध असलेल्या हॉटेल्सवरती हल्ले झाल्याने, त्यांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर दुबई विमानतळाजवळ ड्रोन्स हल्ला झाल्याने शेकडो विमाने रद्द केल्या गेल्या.
युद्ध सुरू झाल्यापासून इराणने यूएईसह कतार, सौदी अरेबिया, बहरीन, कुवैत, ओमान या देशांतील काही ठिकाणांवर हल्ले केले. यातील काही देशांमध्ये अमेरिकेची लष्करी तळे आहेत.