अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव निवळण्यासाठी प्रस्तावित असलेल्या 'इस्लामाबाद २.०' शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे अमेरिकेची विमाने शस्त्रास्त्रे आणि सुरक्षा संसाधनांसह पाकिस्तानात दाखल झाली असताना, दुसरीकडे इराणच्या राष्ट्रपतींनी 'आता युद्ध थांबवा' अशी आर्त साद घातली आहे. मात्र, या चर्चेत सहभागी होण्याबाबत इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप सस्पेन्स कायम ठेवला आहे.
अमेरिकन लवाजमा पाकिस्तानात दाखल
मंगळवारी होणाऱ्या या ऐतिहासिक चर्चेसाठी अमेरिकेने जय्यत तयारी केली आहे. अमेरिकन हवाई दलाची 'C-17' विमाने इस्लामाबादच्या नूरखान एअरबेसवर उतरली आहेत. या विमानांमधून केवळ प्रतिनिधींच्या गाड्याच नाही, तर जॅमर्स, अत्याधुनिक दळणवळण उपकरणे आणि शस्त्रास्त्रांचा मोठा साठा आणण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ४ वाजता अमेरिकेचे अतिमहत्त्वाचे 'एअरफोर्स-२' विमानही इस्लामाबादमध्ये दाखल झाले.
इराणच्या राष्ट्रपतींची शांततेची हाक
देशातील भीषण परिस्थिती आणि युद्धाच्या छायेत होरपळणारी जनता पाहून इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियन यांनी आक्रमकतेऐवजी मवाळ भूमिका घेतल्याचे दिसत आहे. "इराणला अमेरिका आणि इस्रायलसोबतचा हा संघर्ष लवकरात लवकर संपवायला हवा. आम्हाला आता देशाच्या पुनर्निर्माणावर लक्ष केंद्रित करायचे आहे," असे आवाहन त्यांनी केले. नेतृत्वाने जनतेशी प्रामाणिक राहून पारदर्शकता जपली तरच लोकांचा विश्वास टिकून राहील, असेही त्यांनी नमूद केले.
चीनची एन्ट्री आणि कडक भूमिका
या सर्व वादात आता चीननेही आपले पत्ते उघडले आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सौदी अरबच्या क्राउन प्रिन्सशी संवाद साधला. "होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जहाजांची ये-जा कोणत्याही अडथळ्याविना सामान्य राहिली पाहिजे," असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे. मध्य-पूर्व संकटाचे समाधान केवळ कूटनीती आणि चर्चेतूनच शक्य असल्याचे बीजिंगने म्हटले आहे.
लेबनॉनचाही चर्चेत सहभाग?
केवळ इराणच नाही तर लेबनॉनही आता या प्रक्रियेत सक्रिय झाला आहे. लेबनॉनचे राष्ट्रपती जोसेफ आउन यांनी सांगितले की, इस्रायलसोबतच्या संभाव्य चर्चेसाठी माजी अमेरिकन राजदूत सिमोन कराम यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ पाठवले जाईल. आंतरराष्ट्रीय सीमांची ओळख पटवणे आणि ताबा संपवणे हा या चर्चेचा मुख्य उद्देश असेल.
सस्पेन्स अद्याप कायम
एकीकडे अमेरिकेने कंबर कसली असताना, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बागची यांनी मात्र चर्चेच्या वेळापत्रकाबाबत अनभिज्ञता दर्शवली आहे. अमेरिकेसोबतच्या पुढच्या फेरीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत योजना किंवा सहमती झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केल्याने 'इस्लामाबाद २.०' टॉक्स नक्की होणार का? याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Amidst rising tensions, US planes landed in Pakistan with arms. Iran's president urged a ceasefire, focusing on reconstruction. China emphasized stability in the Strait of Hormuz. Lebanon considers talks with Israel. Uncertainty looms over Iran's participation in Islamabad talks.
Web Summary : बढ़ते तनाव के बीच, अमेरिकी विमान हथियारों के साथ पाकिस्तान में उतरे। ईरान के राष्ट्रपति ने पुनर्निर्माण पर ध्यान केंद्रित करते हुए युद्धविराम का आग्रह किया। चीन ने होर्मुज जलडमरूमध्य में स्थिरता पर जोर दिया। लेबनान ने इजरायल के साथ बातचीत पर विचार किया। इस्लामाबाद वार्ता में ईरान की भागीदारी पर अनिश्चितता।