पुतिन यांना मोठा दणका! युक्रेनचा रशियन ऑईल टर्मिनल्सवर भीषण हल्ला; फिनलँडपर्यंत दिसल्या आगीच्या ज्वाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 10:57 IST2026-03-28T10:56:57+5:302026-03-28T10:57:45+5:30

युक्रेनने रशियाच्या बाल्टिक समुद्रातील 'प्रिमोर्स्क' आणि 'उस्त-लुगा' या दोन अत्यंत महत्त्वाच्या तेल निर्यात बंदरांवर ड्रोनचा मोठा हल्ला केला.

Russia's Baltic ports halt oil loadings after massive Ukrainian drone attacks; smoke visible from Finland | पुतिन यांना मोठा दणका! युक्रेनचा रशियन ऑईल टर्मिनल्सवर भीषण हल्ला; फिनलँडपर्यंत दिसल्या आगीच्या ज्वाळा

पुतिन यांना मोठा दणका! युक्रेनचा रशियन ऑईल टर्मिनल्सवर भीषण हल्ला; फिनलँडपर्यंत दिसल्या आगीच्या ज्वाळा

गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाने आता भीषण रूप धारण केले आहे. युक्रेनने बुधवारी रशियाच्या बाल्टिक समुद्रातील 'प्रिमोर्स्क' आणि 'उस्त-लुगा' या दोन अत्यंत महत्त्वाच्या तेल निर्यात बंदरांवर ड्रोनचा मोठा हल्ला केला. या हल्ल्यामुळे बंदरातील तेल साठ्यांनी पेट घेतला असून, आगीचे भीषण लोट शेजारील देश फिनलंडमधूनही स्पष्टपणे दिसत आहेत. या हल्ल्यानंतर रशियाने या दोन्ही बंदरांवरील कच्च्या तेलाचे लोडिंग तूर्तास थांबवले आहे.

अर्थव्यवस्थेवर घाला घालण्याचा युक्रेनचा डाव

युक्रेनच्या 'एसबीयू' या सुरक्षा यंत्रणेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. रशियाची युद्ध अर्थव्यवस्था कमकुवत करण्यासाठी आणि त्यांच्या परकीय चलनावर गदा आणण्यासाठी हे हल्ले करण्यात आल्याचे युक्रेनने म्हटले आहे. 'उस्त-लुगा' बंदरातील ऑईल टँक पार्क आणि लोडिंग स्टॅण्डचे या हल्ल्यात मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, या हल्ल्यादरम्यान दोन ड्रोन भरकटून शेजारील लाटविया आणि एस्टोनियामध्येही कोसळले, ज्यामुळे युरोपातील तणाव अधिकच वाढला आहे.

फिनलँडमधून दिसला धुराचा लोट

फिनलँडच्या तटरक्षक दलाचे संचालक जुक्का-पेक्का लुमिलाहटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिमोर्स्क बंदरातील आग अद्याप पूर्णपणे विझलेली नाही. फिनलंडच्या संसदेचे संरक्षण समिती अध्यक्ष हिक्की ऑटो यांनी हेलसिंकी विमानतळावर उतरताना आकाशात काळ्या धुराचे प्रचंड लोट पाहिल्याचे सांगितले. हे हल्ले फिनलँडच्या सीमेजवळ इतक्या जवळ होणे ही चिंताजनक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

जागतिक बाजारपेठेत चिंतेचे वातावरण

रशियाची ही दोन बंदरे दरवर्षी कोट्यवधी टन कच्च्या तेलाची आणि डिझेलची निर्यात करतात. प्रिमोर्स्क बंदरातून दिवसाला १० लाख बॅरलहून अधिक तेल निर्यात करण्याची क्षमता आहे. मध्यपूर्वेतील संघर्षामुळे आधीच जागतिक तेल बाजार अस्थिर असताना, आता रशियातील या हल्ल्यांमुळे इंधनाचे दर वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने रात्रभरात ३८९ युक्रेनियन ड्रोन पाडल्याचा दावा केला असला तरी, या यशस्वी हल्ल्याने रशियाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Web Title : यूक्रेन का रूसी तेल टर्मिनलों पर हमला; फिनलैंड में भी आग

Web Summary : यूक्रेन ने रूसी तेल टर्मिनलों पर हमला किया, जिससे फिनलैंड तक आग की लपटें दिखीं। यूक्रेन के एसबीयू ने हमले की जिम्मेदारी ली, जिसका उद्देश्य रूस की युद्ध अर्थव्यवस्था को कमजोर करना है। तेल लोडिंग रुकी; वैश्विक बाजारों में मूल्य वृद्धि का डर।

Web Title : Ukraine Strikes Russian Oil Terminals; Fires Seen in Finland

Web Summary : Ukraine attacked key Russian oil terminals, causing massive fires visible even from Finland. The strikes, claimed by Ukraine's SBU, aim to weaken Russia's war economy. Oil loading halted; global markets fear price hikes.