मोतीलाल नगरच्या रहिवाशांना मिळणार १,६०० चौरस फूट रेरा कार्पेटचे घर, संजीव जयस्वाल यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 12:55 IST2026-04-18T12:52:39+5:302026-04-18T12:55:59+5:30

Mumbai News: गोरेगाव येथील मोतीलाल नगर १, २ आणि ३ च्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत रहिवाशांना रेरा कार्पेट क्षेत्रफळानुसार १,६०० चौरस फुटांचे घर दिले जाईल, अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

Residents of Motilal Nagar will get 1,600 sq ft RERA carpeted house, Sanjeev Jaiswal gave information | मोतीलाल नगरच्या रहिवाशांना मिळणार १,६०० चौरस फूट रेरा कार्पेटचे घर, संजीव जयस्वाल यांनी दिली माहिती

मोतीलाल नगरच्या रहिवाशांना मिळणार १,६०० चौरस फूट रेरा कार्पेटचे घर, संजीव जयस्वाल यांनी दिली माहिती

मुंबई  - गोरेगाव येथील मोतीलाल नगर १, २ आणि ३ च्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत रहिवाशांना रेरा कार्पेट क्षेत्रफळानुसार १,६०० चौरस फुटांचे घर दिले जाईल, अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. अगोदर या प्रकल्पात १,६०० चौरस फुटांचे घर बिल्टअप क्षेत्रफळानुसार दिले जाणार होते. या प्रकल्पात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक विकासकाकडून केली जाईल. तर म्हाडाला या पुनर्विकासांतर्गत ४,१०० घरे सोडतीसाठी उपलब्ध होणार आहेत.

म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प राबविला जात आहे. त्याच्या बृहत आराखड्याचे अनावरण जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई उपनगराच्या मध्यवर्ती ठिकाणी १४३ एकर क्षेत्रफळावर विस्तारलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सी अँड डी ए म्हणजेच बांधकाम व विकास संस्थेमार्फत अदानी समूहामार्फत साकारण्यात येत असून, देशातील हा सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प आहे, असा दावा म्हाडाने केला आहे. येथील रहिवाशांना रेरा कार्पेट क्षेत्रफळानुसार १,६०० चौरस फुटांचे घर देण्याचा प्रस्ताव सरकारला सादर करण्यात आला असून, दोन ते तीन दिवसांत त्यास मंजुरीही मिळणार आहे.

झोपडीधारकांना ३०० चौरस फुटांची सदनिका
- ३,७०२ रहिवाशांना प्रत्येकी १,६०० चौ. फूट क्षेत्रफळाची सदनिका विनामूल्य मिळणार
- ३२८ वैयसायिकांना ९८७ चौ. फूट क्षेत्राचे व्यावसायिक गाळे
- १,६०० झोपडपट्टीधारकांना एसआरए कायद्यान्वये ३०० चौ. फूट क्षेत्रांची घरे

आदर्श वसाहतीची निर्मिती
१. प्रशस्त, सुसज्ज घरे आणि अत्याधुनिक, सर्व सोयीसुविधांयुक्त आदर्श वसाहतीची निर्मिती करण्याचे नियोजन आहे.
२. रहिवाशांना नवीन, सुरक्षित आणि आधुनिक जीवनशैली उपलब्ध करून देण्याचा म्हाडाने प्रयत्न केला असल्याचेही जयस्वाल यांनी नमूद केले.
३. सुमारे दोन दशकांपासून हा प्रकल्प प्रलंबित होता. १९६० च्या दशकामध्ये उभारलेली गोरेगाव परिसरातील ही वसाहत, त्या काळातील मध्यमवर्गीय गरजांना पूरक ठरली होती.
४. कालांतराने वाढती लोकसंख्या, बदलती जीवनशैली आणि पायाभूत सुविधांवरील ताण, यामुळे या वसाहतीच्या पुनर्विकासाची गरज प्रकर्षाने जाणवू लागली.

रहिवासी २,४०० चौरस फुटांवर ठाम
रहिवाशांना म्हाडाचा प्रस्ताव अमान्य असून, त्यांनी २,४०० चौरस फुटांच्या घरांची मागणी केली आहे. मोतीलाल नगर विकास समितीचे सचिव निलेश प्रभू यांनी सांगितले, की समितीने २,४०० चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळाची घरे आणि २,०७० चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळाच्या व्यावसायिक गाळ्यांच्या मागणीचा ठामपणे पुनरुच्चार केला. रहिवाशांनी फिजिबिलिटी रिपोर्टच्या आधारावर ही मागणी उचलून धरली आहे. म्हाडाच्या प्रस्तावात ३० लाख कॉर्पस फंडाबाबत तरतूद नाही. ८५ टक्के रहिवाशांनी ४५ चौरस मीटर क्षेत्रफळ विकत घेतलेले असताना म्हाडा नकार का देत आहे? असा सवाल त्यांनी केला.

विशेष प्रकल्प प्राधिकरणाचा दर्जा
प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता सरकारने विशेष प्रकल्प प्राधिकरणाचा दर्जा दिला आहे. प्रकल्पाची बांधकाम व विकास संस्था म्हणून निविदा प्रक्रियेतून अदानी समूहाची निवड झाली आहे. भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सात वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट म्हाडाचे आहे.

मैदान, जिमखाना, ज्येष्ठांसाठी विश्रांती क्षेत्र, सायकल ट्रॅक
वसाहतीतील विविध सुविधा उदा. शाळा, रुग्णालय, बाजारपेठ, व्यावसायिक संकुल, उद्याने, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष विश्रांती क्षेत्रे, खेळाचे मैदाने, जॉगिंग पार्क, सायकल ट्रॅक, सांस्कृतिक सभागृह, जिमखाना यासारख्या सुविधा प्रकल्पाच्या १५ मिनिटांच्या अंतरावर नागरिकांना उपलब्ध होतील.

हरित पट्टा, बहुमजली पार्किंग
सुमारे १५ एकर जागेवर हरित पट्ट्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर बहुमजली पार्किंग व्यवस्था, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, पावसाच्या पाण्याचे संधारण, सौरऊर्जेचा वापर, स्मार्ट सुरक्षा यंत्रणा, अग्निसुरक्षा व्यवस्था आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात येणार आहे.

Web Title: Residents of Motilal Nagar will get 1,600 sq ft RERA carpeted house, Sanjeev Jaiswal gave information

टॅग्स :Mumbaiमुंबई