इराणच्या खार्ग बेटावरील लष्करी ठिकाणे उद्ध्वस्त; होर्मुझचा मार्ग मोकळा न केल्यास तेलसाठ्यांवर हल्ल्यांचाही अमेरिकेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 06:07 IST2026-03-15T06:05:30+5:302026-03-15T06:07:32+5:30
अमेरिकेचे २,५०० मरिन सज्ज, तेलव्यवहार युआनमध्ये होण्याची इराणची अट

इराणच्या खार्ग बेटावरील लष्करी ठिकाणे उद्ध्वस्त; होर्मुझचा मार्ग मोकळा न केल्यास तेलसाठ्यांवर हल्ल्यांचाही अमेरिकेचा इशारा
दुबई : इराणच्या तेल निर्यातीसाठी अत्यंत महत्त्वाच्या खार्ग बेटावरील सर्व लष्करी ठिकाणे अमेरिकेने शुक्रवारी बॉम्बहल्ले करून नष्ट केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. या हल्ल्यात १५ स्फोट झाल्याचे इराणच्या 'फार्स' या वृत्तसंस्थेने सांगितले. तर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांच्या वाहतुकीत अडथळे आणणे सुरूच ठेवले तर पुढील कारवाईत तेल रिफायनरी, तेलसाठ्यांना लक्ष्य केले जाईल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला. ट्रम्प यांनी आपल्या 'ट्रूथ सोशल' या वेबसाइटवर अमेरिकेने अचूक हल्ले केल्याचे म्हटले. मात्र या बेटावरील तेल साठ्यांना नुकसान पोहोचवलेले नाही, असेही स्पष्ट केले. अमेरिकेने या बेटावरील हवाई संरक्षण केंद्र, नौदल तळ, विमानतळ नियंत्रण मनोरा, तेल कंपनीचा हेलिकॉप्टर हँगर या ठिकाणांवर हल्ले केले आहेत. दरम्यान हा संघर्ष तीव्र होत असताना अमेरिकेने युद्धात आणखी २,५०० मरीन सैनिक आणि एक युद्धनौका पाठवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एका अमेरिकी अधिकाऱ्याने दिली.
दूतावासावर हल्ला -
इराकची राजधानी बगदादमधील अमेरिकेच्या दूतावासावर शनिवारी क्षेपणास्त्र डागण्यात आले. हे क्षेपणास्त्र दूतावासाच्या परिसरातील हेलिपॅडवर आदळले. या परिसरातून धुराचे लोट उठताना दिसले. यात जीवितहानीबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. हा दूतावास बगदादमधील अत्यंत संरक्षित ग्रीन झोन परिसरात आहे.
युआनमध्ये व्यवहार...
होर्मुझमधून काही मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी देण्याचा विचार इराणचा असून, त्यासाठी तेलाचा व्यवहार चिनी युआन चलनात करण्याची अट इराण घालू शकते असे वृत्त आहे.
‘शिवालिक’नंतर ‘नंदा देवी’ या जहाजानेही होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे प्रवास केला असून, ते लवकरच भारतात येणार आहे. नंदा देवी जहाज ४६ हजार टनांहून अधिक एलपीजीची वाहतूक करत आहे.
इराणच्या मुख्य भूमीपासून सुमारे ३० किलोमीटरवर खार्ग बेट आहे. हे बेट तेलनिर्यात टर्मिनल आहे. या एकाच बेटावरून इराणचे ९० टक्के निर्यात होते. या बेटावर पाइपलाइनचे विस्तृत जाळे असून ते साठवण टाक्या आणि जहाजांवर तेल भरण्यासाठीच्या जेट्टींशी जोडलेले आहे. अशा तेल पायाभूत सुविधा एकवटल्यामुळे हे बेट इराणचे ‘चोक-पॉइंट’ मानले जाते. हे उद्ध्वस्त झाल्यास जगापुढे तेलसंकट उभे राहील.
२९ राज्यांत व्यावसायिक एलपीजीची विक्री सुरू
देशात २९ राज्ये आणि
केंद्रशासित प्रदेशांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे वितरण सुरू झाले आहे.
घरगुती वापराच्या गॅसचा पुरेसा साठा असूनही ‘पॅनिक बुकिंग’ वाढत आहे. भारतात कच्च्या तेलाचे पुरेसे साठे आहेत आणि घरगुती रिफायनरीज पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. यामुळे देशभर पुरेसे पेट्रोल आणि डिझेल आहे. देशांतर्गत एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य
दिले जात असल्याचे सरकारने म्हटले आहे.
सिलिंडरसाठी रांगा लावू नका : सरकारची विनंती
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे वितरण प्राधान्याने रुग्णालये, शाळा आणि इतर आवश्यक सेवांमध्ये केले जाणार आहे. व्यावसायिक ठिकाणांनाही मर्यादित प्रमाणात सिलिंडर दिले जाणार आहेत.
केंद्र सरकारने ग्राहकांना विनंती केली आहे की, स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या बुकिंगसाठी किंवा डिलिव्हरीसाठी रांगा लावण्याची गरज नाही. सिलिंडर थेट घरपोच दिले जातील.