"लवकर निर्णय घ्या, नाहीतर काहीच शिल्लक राहणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 08:14 IST2026-05-18T08:13:35+5:302026-05-18T08:14:01+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट उडवून देण्याची धमकी दिली आहे. "वेळ निघून चालली आहे, लवकर निर्णय घ्या नाहीतर काहीच शिल्लक राहणार नाही," असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

"लवकर निर्णय घ्या, नाहीतर काहीच शिल्लक राहणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी
"वेळ वेगाने निघून चालली आहे आणि इराणकडे आता फारसा वेळ उरलेला नाही. जर त्यांनी अणू कराराबाबत तातडीने एखादा चांगला प्रस्ताव दिला नाही, तर अमेरिका त्यांच्यावर आधीपेक्षाही मोठा लष्करी हल्ला करेल. जर वेळीच निर्णय घेतला नाही, तर इराणमध्ये काहीच शिल्लक राहणार नाही..." अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट सोशल मीडियावरून इराणला दिलेला हा इशारा सध्या जगभरात भीतीचे वातावरण पसरवत आहे. अमेरिका आणि इराणमधील अणू कराराची चर्चा फिस्कटल्यानंतर मध्यपूर्वेतील तणाव आता सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे.
ट्रम्प यांनी अमेरिकन मीडिया 'एक्सिओस'शी बोलताना स्पष्ट केले की, अमेरिका हे युद्ध संपवण्यासाठी एक सन्मानजनक शांतता करार करू इच्छित आहे, परंतु इराण अमेरिकेच्या अटी मान्य करायला तयार नाही. त्यामुळे आता ट्रम्प यांनी इराणला थेट धोक्याची घंटा वाजवली आहे.
व्हाइट हाऊसच्या 'सिच्युएशन रूम'मध्ये मंगळवारी मोठी बैठक
अमेरिकन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मंगळवारी व्हाइट हाऊसच्या अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या 'सिच्युएशन रूम'मध्ये आपली राष्ट्रीय सुरक्षा टीम आणि लष्करी प्रमुखांची एक तातडीची बैठक बोलावली आहे. या हायव्होल्टेज बैठकीत इराणविरुद्धच्या संभाव्य लष्करी कारवाईच्या पर्यायांवर सविस्तर चर्चा होणार आहे. जर इराणने चर्चेची पुढची पायरी स्वीकारली नाही, तर अमेरिका कधीही पुन्हा हवाई हल्ले सुरू करू शकते, असे संकेत मिळत आहेत.
ट्रम्प अन् नेतन्याहू यांच्यात फोनवर खलबत्ते
इराणला ही खुली धमकी देण्याच्या अवघ्या एक दिवस आधी, म्हणजेच रविवारी, डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर प्रदीर्घ चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी इराणमधील सध्याची परिस्थिती आणि पुढील लष्करी डावपेचांवर रणनीती आखली. यापूर्वी शनिवारी ट्रम्प यांनी त्यांच्या व्हर्जिनियातील गोल्फ क्लबमध्ये एक गुप्त बैठक घेतली होती, ज्यामध्ये अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हॅन्स, परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ आणि सीआयए प्रमुख जॉन रॅटक्लिफ यांसारखे दिग्गज उपस्थित होते.
पाकिस्तान आणि कतर मैदानात; मध्यस्थीचे प्रयत्न सुरू
एकीकडे अमेरिकेने युद्धाची तयारी सुरू केली असताना, दुसरीकडे पाकिस्तान आणि कतर हे देश अमेरिका-इराणमधील हे युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थीचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानच्या गृह मंत्र्यांनी स्वतः तेहरान गाठून तिथल्या सर्वोच्च नेत्यांशी चर्चा केली आहे. तर कतरच्या पंतप्रधानांनीही दोन्ही देशांच्या प्रमुखांशी फोनवर संपर्क साधून शांततेचे आवाहन केले आहे.
युएईच्या अणू ऊर्जा प्रकल्पावर ड्रोन हल्ला; तणाव वाढला
या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर रविवारी संयुक्त अरब अमिरातीमधील 'बराकाह न्यूक्लियर पॉवर प्लांट'च्याबाहेर एक भीषण ड्रोन हल्ला झाला. या आत्मघाती ड्रोन हल्ल्यामुळे प्लांटच्या बाहेरील इलेक्ट्रिक जनरेटरला मोठी आग लागली. युएईच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांच्या हद्दीत ३ ड्रोन घुसले होते, त्यापैकी २ ड्रोन हवेतच पाडण्यात आले, तर एकाने जनरेटरला लक्ष्य केले. युएईने थेट इराणचे नाव घेतले नसले तरी हा हल्ला अत्यंत गंभीर आणि अणुसुरक्षेला आव्हान देणारा असल्याचे म्हटले आहे. सुदैवाने, या हल्ल्यामुळे मुख्य अणू प्रकल्पाला आणि तिथे असणाऱ्या रेडिएशन लेव्हलला कोणताही धक्का पोहोचलेला नाही. मात्र, या हल्ल्याने आगीत तेल ओतण्याचे काम केले असून, अमेरिका आता इराणवर काय कारवाई करते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.