NEET Paper Leak : पेपर विकणारेच नाही तर, लाखो रुपये खर्च करून विकत घेणारे पालकही सीबीआयच्या निशाण्यावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 08:43 IST2026-05-18T08:42:04+5:302026-05-18T08:43:11+5:30

NEET-UG 2026 पेपर लीक प्रकरणात सीबीआयची कारवाई आता अधिक तीव्र झाली आहे. केवळ दलालच नाही, तर लाखो रुपये मोजून पेपर खरेदी करणारे श्रीमंत पालकही आता सीबीआयच्या रडारवर आले आहेत.

NEET Paper Leak: Not only those selling the paper, but also the parents who bought it by spending lakhs of rupees are under the CBI's target! | NEET Paper Leak : पेपर विकणारेच नाही तर, लाखो रुपये खर्च करून विकत घेणारे पालकही सीबीआयच्या निशाण्यावर!

AI Generated Image

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या 'नीट-यूजी २०२६' पेपर लीक प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्यूरोची कारवाई आता एका अत्यंत वेगळ्या आणि गंभीर वळणावर पोहोचली आहे. आतापर्यंत केवळ पेपर लीक करणारे मास्टरमाइंड, सॉल्वर आणि दलाल यांच्याभोवती फिरणारा सीबीआयच्या तपासाचा फास आता थेट विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोहोचला आहे. आपल्या मुलांना मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी लाखो रुपयांची लाच देऊन पेपर खरेदी करणाऱ्या श्रीमंत पालकांना सीबीआयने रडारवर घेतले आहे.

याच पार्श्वभूमीवर, सीबीआयच्या आठ अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने शनिवार आणि रविवारी महाराष्ट्रातील नांदेड आणि लातूरमध्ये अनेक ठिकाणी धडक छापे टाकले. नांदेडच्या विद्युत नगर भागातील एका बड्या व्यावसायिकाच्या घरासह ३ ते ४ वेगवेगळ्या ठिकाणांची कसून झडती घेण्यात आली.

लेकीसाठी मोजले १० लाख रुपये; पालकांची ८ तास चौकशी!

तपासादरम्यान सीबीआयला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, नांदेडमधील एका नामांकित व्यावसायिकाने आपल्या मुलीला परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळावेत यासाठी पेपर लीक करणाऱ्या दलालांना तब्बल १० लाख रुपये दिले होते. ही रक्कम दोन वेगवेगळ्या विक्रेत्यांना ५-५ लाख याप्रमाणे देण्यात आली होती. या माहितीच्या आधारे सीबीआयने संबंधित विद्यार्थिनीच्या माता-पित्यांची तब्बल आठ तास कसून चौकशी केली. या छाप्यात पालकांचे मोबाईल फोन, लॅपटॉप, महत्त्वपूर्ण कागदपत्रे, कॉल रेकॉर्ड आणि व्हॉट्सॲप चॅट्स जप्त करण्यात आले असून त्यांचे फॉरेन्सिक विश्लेषण केले जात आहे.

पुण्याच्या 'त्या' कोचिंग क्लासचे पोस्टर अन् सीबीआयचा संशय!

या तपासात पुण्यातील एका खाजगी कोचिंग इन्स्टिट्यूटचे कनेक्शनही समोर आले आहे. संबंधित विद्यार्थिनी परीक्षेच्या तयारीसाठी १५ दिवस पुण्यात या कोचिंग क्लासमध्ये राहिली होती. धक्कादायक बाब म्हणजे, 'नीट'चा निकाल लागण्यापूर्वीच या इन्स्टिट्यूटने 'निकाल तर येणारच' अशी टॅगलाईन वापरून टॉपर्स विद्यार्थ्यांचे मोठे पोस्टर्स शहरात लावले होते, ज्यामध्ये या संशयित विद्यार्थिनीचाही फोटो झळकत होता. यामुळे सीबीआयचा संशय अधिक बळावला आहे.

याबाबत संस्थेचे संचालक अतुल मोरे यांना विचारले असता त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. "ती विद्यार्थिनी आमच्याकडे शिकत होती आणि मॉक टेस्टमध्ये तिला ४०० ते ४५० गुण मिळत होते. मात्र, परीक्षेच्या आधीचे १५ दिवस तिचा आमच्या संस्थेशी काहीही संबंध नव्हता," असा दावा मोरे यांनी केला आहे.

पुणे, लातूर ते नांदेड... पैसे वसूल करण्यासाठी पेपर पुढे विकला?

सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे रॅकेट अत्यंत संघटित पद्धतीने पुणे, लातूर, नांदेड आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये चालवले जात होते. धक्कादायक बाब म्हणजे, काही पालकांनी १० ते २५ लाख रुपये देऊन पेपर खरेदी केला आणि त्यानंतर आपल्या रक्कमेची काही प्रमाणात वसुली व्हावी, यासाठी तो पेपर इतर ओळखीच्या पालकांनाही पुढे विकला. सीबीआय आता अशा सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांची आणि पालकांची यादी तयार करत आहे ज्यांनी जाणूनबुजून या काळ्याबाजाराचा फायदा घेतला.

शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह, देशवासीयांचे लक्ष

देशातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी वैद्यकीय प्रवेश परीक्षा अशा प्रकारे डागाळल्यामुळे आणि पैशांच्या जोरावर पेपर लीक झाल्यामुळे देशातील लाखो प्रामाणिक, कष्टकरी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. या घोटाळ्याने शिक्षण व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. सीबीआय आता या प्रकरणातील मनी ट्रेल शोधत असून, येत्या काही दिवसांत महाराष्ट्रासह इतर राज्यांतही अनेक पालकांना आणि दलालांना बेड्या ठोकल्या जाण्याची शक्यता आहे.

Web Title : NEET पेपर लीक: सीबीआई की निगाहें पेपर खरीदने वाले अभिभावकों पर

Web Summary : सीबीआई NEET पेपर लीक मामले में बच्चों के लिए लाखों खर्च करने वाले अभिभावकों की जांच कर रही है। नांदेड और लातूर में छापे मारे गए, जिनमें 10 लाख रुपये तक के भुगतान के सबूत मिले। पुणे का एक कोचिंग संस्थान भी संदेह के घेरे में है।

Web Title : NEET Paper Leak: CBI Targets Parents Who Bought Leaked Papers

Web Summary : CBI investigates parents who paid lakhs to secure NEET paper leaks for their children. Raids in Nanded and Latur uncovered evidence of payments up to ₹10 lakh. A coaching institute in Pune is also under scrutiny for suspicious promotions.