इराण, दुबईसह अन्य देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांचे काय? सुरक्षित मायदेशात आणण्याची कशी तयारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 14:23 IST2026-03-01T14:23:04+5:302026-03-01T14:23:37+5:30

America Israel Iran War: या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देशांमध्ये भारतीय अडकले आहेत.

know what about indians stranded in iran dubai and other countries how are they preparing to bring them back home safely | इराण, दुबईसह अन्य देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांचे काय? सुरक्षित मायदेशात आणण्याची कशी तयारी?

इराण, दुबईसह अन्य देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांचे काय? सुरक्षित मायदेशात आणण्याची कशी तयारी?

America Israel Iran War: अण्वस्त्रनिर्मिती रोखण्यासाठी करार करण्याकरिता चर्चेच्या तीन फेऱ्या अपयशी ठरल्यानंतर अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी इराणवर जोरदार हल्ले चढविले. या हल्ल्यात इराणमध्ये २०० पेक्षा अधिक जण ठार झाले. दक्षिण इराणमध्ये मिनाब येथे शाळेला लक्ष्य करण्यात आले, यात ८५ विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत इराणने इस्रायलसह आठ देशांवर प्रतिहल्ले केले. यामुळे अनेक ठिकाणची विमानसेवा बंद करण्यात आली असून, शेकडो भारतीय अडकल्याची माहिती मिळाली आहे. 

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर मध्य पूर्वेतील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. अद्यापही हल्ले सुरूच आहेत. अनेक देशांनी हाय अलर्ट जारी केला आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनेक मध्य पूर्वेतील देशांमधील भारतीय दूतावासांनी त्यांच्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, बहरीन, पॅलेस्टाईन, कतार आणि इराणमध्ये राहणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या भारतीयांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच तेल अवीवमधील भारतीय दूतावासाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. भारतीय नागरिकांना इस्रायली प्रशासन आणि होम फ्रंट कमांडच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे सांगण्यात आले आहे. 

भारतीयांना जास्तीत जास्त सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

तेहरान येथील भारतीय दूतावासाने इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी एक नवीन सूचना जारी केली आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दूतावासाने सर्व भारतीयांना जास्तीत जास्त सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे आणि शक्य तितके घरातच राहावे. भारतीय नागरिकांना नियमितपणे माहिती घेण्याचा, परिस्थितीबद्दल अपडेट राहण्याचा आणि दूतावासाकडून पुढील माहितीची वाट पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी काही नंबर जारी करण्यात आले आहेत. 

अबू धाबी, रियाध, सौदी अरेबिया, बहरीन येथील भारतीय नागरिकांना सूचना

अबू धाबीमधील भारतीय दूतावासाने युएईमध्ये राहणाऱ्या भारतीयांना सतर्क राहण्याचे आणि गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन केले आहे. रियाधमधील भारतीय दूतावासाने सौदी अरेबियातील भारतीयांना स्थानिक सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. बहरीन आणि पॅलेस्टाईनमधील भारतीय दूतावासांनीही सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

एअर इंडिया, इंडिगोची विमाने रद्द

तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय विमान कंपन्यांनीही खबरदारीचे उपाय केले आहेत. एअर इंडियाने मध्य पूर्वेला जाणारी अनेक उड्डाणे रद्द केली आहेत. दिल्लीहून तेल अवीवला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला परत बोलावण्यात आले. इंडिगोने इराणच्या हवाई हद्दीतून जाणारी आंतरराष्ट्रीय उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत. एअर इंडिया एक्सप्रेसने पश्चिमेकडे जाणारी आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित केली आहेत.

दरम्यान, या भागातील परिस्थिती अजूनही गंभीर आहे. अनेक देशांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. भारतीय दूतावास सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांना सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचा सल्ला देत आहेत. एकंदरीत, मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि त्यांच्या दूतावासांच्या संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Web Title : ईरान, दुबई में फंसे भारतीय: संघर्ष के बीच वतन वापसी की कोशिशें जारी

Web Summary : ईरान में हमलों के बाद बढ़ते तनाव के बीच, भारतीय दूतावासों ने मध्य पूर्व में नागरिकों के लिए सुरक्षा परामर्श जारी किए। एयर इंडिया और इंडिगो ने उड़ानें रद्द कीं। भारतीयों से सतर्क रहने, अनावश्यक यात्रा से बचने और सहायता और अपडेट के लिए अपने दूतावासों से संपर्क में रहने का आग्रह किया गया है।

Web Title : Stranded Indians in Iran, Dubai: Repatriation Efforts Underway Amidst Conflict

Web Summary : Amidst escalating tensions after attacks in Iran, Indian embassies issue safety advisories for citizens in the Middle East. Air India and Indigo cancel flights. Indians are urged to stay vigilant, avoid unnecessary travel, and remain in contact with their embassies for assistance and updates.