होर्मुजच्या सामुद्रधुनीतून तेलाचा टँकर बाहेर काढला? अमेरिकन मंत्र्यांचे ट्विट आणि कच्च्या तेलाचे दर १५ टक्क्यांनी कोसळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 09:12 IST2026-03-11T09:10:58+5:302026-03-11T09:12:35+5:30
Hormuz Strait Oil Tanker News: होर्मुजच्या सामुद्रधुनीत अमेरिकेचा तेल टँकर एस्कॉर्ट केल्याचा दावा फसला. ऊर्जा मंत्री क्रिस राइट यांचे ट्विट डिलीट. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण. वाचा सविस्तर.

होर्मुजच्या सामुद्रधुनीतून तेलाचा टँकर बाहेर काढला? अमेरिकन मंत्र्यांचे ट्विट आणि कच्च्या तेलाचे दर १५ टक्क्यांनी कोसळले
इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा भडका आता जागतिक अर्थव्यवस्थेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. अमेरिकेचे ऊर्जा मंत्री क्रिस राइट यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ माजली. अमेरिकेने होर्मुजच्या सामुद्रधुनीतून एक तेल टँकर यशस्वीरित्या बाहेर काढल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला होता, ज्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत अवघ्या काही मिनिटांत १५ टक्क्यांची मोठी घसरण झाली.
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनातील ऊर्जा मंत्री क्रिस राइट यांनी 'X' वर पोस्ट केली की, "अमेरिकन नौदलाने होर्मुजच्या सामुद्रधुनीतून एका तेल टँकरला सुरक्षितपणे एस्कॉर्ट केले आहे." या बातमीने बाजारात सकारात्मक संकेत गेले आणि ब्रेंट क्रूडचे दर १२० डॉलरवरून थेट ८० डॉलरच्या खाली आले. मात्र, काही वेळातच ही पोस्ट डिलीट करण्यात आली, ज्यामुळे संभ्रम वाढला.
व्हाईट हाऊसचे स्पष्टीकरण
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी तातडीने स्पष्ट केले की, अमेरिकन नौदलाने सध्या तरी अशा कोणत्याही टँकरला एस्कॉर्ट केलेले नाही. ऊर्जा मंत्रालयानेही ही पोस्ट कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे झाल्याचे सांगत माफी मागितली.
इराणचा टोला
दुसरीकडे, इराणने या घटनेवरून अमेरिकेची जोरदार थट्टा केली आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गलीबाफ यांनी ट्विट करत म्हटले की, "अमेरिकन नौदलाने टँकर पार करून नेला? कदाचित 'प्लेस्टेशन' गेममध्ये झाला असावा!" तर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिकेवर मार्केट मॅनिपुलेट करण्यासाठी 'फेक न्यूज' पसरवल्याचा आरोप केला आहे.