...तर संघर्ष अधिक निर्माण होईल; मध्य पूर्वेतील संघर्षावर चीनने मांडली स्पष्ट भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 10:41 IST2026-03-08T10:40:24+5:302026-03-08T10:41:12+5:30
दोन्ही बाजूंनी अडथळे दूर करणे आवश्यक आहे. चीनसोबत एकाच दिशेने काम करावे असा सल्ला त्यांनी अमेरिकेला दिला.

...तर संघर्ष अधिक निर्माण होईल; मध्य पूर्वेतील संघर्षावर चीनने मांडली स्पष्ट भूमिका
बीजिंग - इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावात चीनने कठोर भूमिका घेतली आहे. मध्य पूर्वेत लष्करी कारवाईऐवजी राजनैतिक मार्ग स्वीकारा. इराण आणि मध्य पूर्वेतील मुद्दे योग्यरितीने सांभाळले पाहिजेत असं चीनने जागतिक व्यासपीठावर आवाहन केले आहे. इराण आणि आखाती देशांमध्ये सार्वभौमत्व आणि सुरक्षिततेचा प्रत्येक परिस्थितीत सन्मान केला गेला पाहिजे. त्यामुळे हा तणाव संपवण्यासाठी एकत्रित चर्चा करण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे अशी भूमिका चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी मांडली आहे.
क्रांतीचे षडयंत्र अथवा सत्ता परिवर्तन करण्याच्या प्रयत्नांना जनसमर्थन मिळत नाही असं चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी म्हणाले. चीनने प्रमुख देशांना या संकटातून मार्ग काढण्यासाठी मदत करण्याचा सल्ला दिला आहे. चीन भविष्यात आपले प्रयत्न आणखी वेगाने करण्यास तयार आहे. चीन कायम प्रादेशिक सुरक्षेसाठी एक मार्ग म्हणून काम करतो असंही चीनने स्पष्ट केले.
अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या बीजिंग दौऱ्याबाबतही चीनने भाष्य केले. चीनची भूमिका नेहमी सकारात्मक आणि खुली राहिली आहे. चीन आणि अमेरिका यांच्यात कोणताही संवाद न झाल्यास केवळ गैरसमज आणि अधिक संघर्ष निर्माण होतील. दोन्ही देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी चांगले संवाद बनवण्यासाठी मेहनत घेतली आहे. त्यामुळे हे वर्ष चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंधांसाठी मोठे आहे असं चीनचे परराष्ट्र मत्री वांग यी यांनी सांगितले.
दरम्यान, दोन्ही बाजूंनी अडथळे दूर करणे आवश्यक आहे. चीनसोबत एकाच दिशेने काम करावे असा सल्ला त्यांनी अमेरिकेला दिला. आता दोन्ही पक्षांनी तयारी करणे गरजेचे आहे. कारण उच्चस्तरीय अजेंडा आधीच चर्चेसाठी आहे असंही चीनने अमेरिकेसोबत संबंधांवर भाष्य केले.
रशियाची इराणला मदत
अमेरिकेच्या युद्धनौका, विमाने आणि इतर लष्करी मालमत्तांवर अचूकपणे हल्ले करण्यास सोपे जाण्यासाठी रशियाकडूनइराणला महत्त्वाची माहिती पुरवली जात असल्याचा दावा अमेरिकेच्या गुप्तचर विभागासंबंधित दोन अधिकाऱ्यांनी केला आहे; पण यासंदर्भातील थेट पुरावे अद्याप मिळालेले नाहीत, असेही या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.