'एपस्टीन फाइल्स'मध्ये नाव येताच उचललं टोकाचं पाऊल; नॉर्वेचे माजी पंतप्रधान जगलँड रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 13:16 IST2026-02-25T13:13:52+5:302026-02-25T13:16:46+5:30

जगातील सर्वात शांत आणि विकसित देशांपैकी एक असलेल्या नॉर्वेच्या राजकारणात सध्या एका नावाचा मोठा भूकंप झाला आहे.

Extreme step taken as soon as name appeared in 'Epstein Files'; Former Norwegian Prime Minister Jagland admitted to hospital | 'एपस्टीन फाइल्स'मध्ये नाव येताच उचललं टोकाचं पाऊल; नॉर्वेचे माजी पंतप्रधान जगलँड रुग्णालयात दाखल

'एपस्टीन फाइल्स'मध्ये नाव येताच उचललं टोकाचं पाऊल; नॉर्वेचे माजी पंतप्रधान जगलँड रुग्णालयात दाखल

जगातील सर्वात शांत आणि विकसित देशांपैकी एक असलेल्या नॉर्वेच्या राजकारणात सध्या एका नावाचा मोठा भूकंप झाला आहे. नॉर्वेचे माजी पंतप्रधान आणि नोबेल शांतता समितीचे माजी अध्यक्ष थोरबजॉर्न जगलँड यांनी कथितरित्या आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुख्यात अमेरिकन गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याच्याशी असलेल्या संबंधांमुळे आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळे ते सध्या तपास यंत्रणांच्या रडारवर होते. या संकटामुळे नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

थोरबजॉर्न जगलँड यांच्यावर जेफ्री एपस्टीनकडून आर्थिक फायदे घेतल्याचे आणि आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे गंभीर आरोप आहेत. अमेरिकन न्याय विभागाच्या फाइल्समधून धक्कादायक माहिती उघड झाली आहे की, जगलँड आणि त्यांचे कुटुंब पॅरिस, न्यूयॉर्क आणि पाम बीच येथील एपस्टीनच्या आलिशान बंगल्यांवर वास्तव्यास होते. इतकेच नाही तर एपस्टीनच्या वादग्रस्त खासगी बेटावर जाण्याचाही त्यांचा प्लॅन होता, असे तपासात समोर आले आहे.

नोबेल 'बिग शॉट' आणि एपस्टीनची मैत्री

एपस्टीन आणि जगलँड यांच्यातील संवाद तपासला असता, त्यात जगलँड यांचा उल्लेख 'नोबेल बिग शॉट' असा करण्यात आला होता. एपस्टीनने जगलँड यांच्या राजकीय वजनाचा वापर करून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासारख्या बड्या नेत्यांशी भेटीगाठी घडवून आणण्यासाठी मदत मागितली होती. त्या बदल्यात जगलँड यांना महागड्या भेटवस्तू, परदेश दौरे आणि कर्जाची ऑफर देण्यात आल्याचा संशय आहे.

१० वर्षांच्या कारावासाची टांगती तलवार

नॉर्वेची आर्थिक गुन्हे शाखा 'ओकोक्रिम' या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. जगलँड यांच्या ओस्लोमधील घरासह इतर मालमत्तांवर नुकतेच छापे टाकण्यात आले होते. त्यांच्यावर अधिकृतपणे भ्रष्टाचाराचे आरोप निश्चित करण्यात आले असून, यात दोषी आढळल्यास त्यांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. विशेष म्हणजे, या तपासात सहकार्य करण्यासाठी युरोप परिषदेने त्यांची डिप्लोमॅटिक इम्युनिटी देखील काढून घेतली आहे.

जगलँड यांची बाजू

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जगलँड यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी कोणतेही चुकीचे काम केल्याचे नाकारले असून, एपस्टीनसोबतची मैत्री हा केवळ एक चुकीचा निर्णय होता, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, या तपासामध्ये त्यांचा कोणत्याही प्रकारच्या लैंगिक गुन्ह्यांशी संबंध असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही, तपास केवळ आर्थिक गैरव्यवहारावर केंद्रित आहे. पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री आणि नोबेल समितीचे अध्यक्ष अशा उच्च पदांवर राहिलेल्या व्यक्तीचे नाव अशा प्रकारे भ्रष्टाचारात येणे, ही नॉर्वेसाठी मोठी नामुष्की मानली जात आहे.

Web Title : एपस्टीन फाइल्स में नाम आने पर नॉर्वे के पूर्व पीएम ने की आत्महत्या की कोशिश

Web Summary : नॉर्वे के पूर्व पीएम जगलैंड, जेफ्री एपस्टीन से जुड़े होने और भ्रष्टाचार के आरोपों के बाद अस्पताल में भर्ती। आत्महत्या का प्रयास। एपस्टीन से दोस्ती को बताया गलती, वित्तीय कदाचार पर जांच जारी।

Web Title : Ex-Norway PM Jagland Hospitalized After Epstein Link, Alleged Suicide Attempt

Web Summary : Former Norwegian PM Jagland, linked to Jeffrey Epstein and facing corruption charges, allegedly attempted suicide. He denies wrongdoing, claiming the Epstein friendship was a mistake. Investigation focuses on financial misconduct.