Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 07:31 IST2026-04-24T07:30:09+5:302026-04-24T07:31:11+5:30
US Iran Conflict: हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या इराणच्या छोट्या नौका दिसताच त्या गोळ्या घालून नष्ट करा, असे आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या नौदलाला दिले.

Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
वॉशिंग्टन : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या इराणच्या छोट्या नौका दिसताच त्या गोळ्या घालून नष्ट करा, असे आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या नौदलाला दिले आहेत. गुरुवारी सकाळी आपल्या ‘ट्रूथ सोशल’ या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये अमेरिकेचे लष्कर होर्मुझच्या जलमार्गातील सुरुंग हटवण्याचे प्रयत्न अधिक वेगाने करत असल्याचाही दावा ही त्यांनी केला.
इराणी नेतृत्वावर टीका
ट्रम्प यांनी इराणमध्ये सध्या नेतृत्वावरून मोठा गोंधळ सुरू असल्याचाही दावा केला. इराणला आपला नेता कोण आहे हे समजणे कठीण जात आहे. तेथील कट्टरपंथी आणि मवाळ गटांमधील अंतर्गत संघर्ष टोकाला पोहोचला आहे. युद्ध संपवण्यासाठी इराणने एक 'एकत्रित प्रस्ताव' द्यावा, यासाठी आपण शस्त्रसंधी वाढवल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
शेअर बाजारात घसरण
इराणसोबतच्या युद्धामुळे अनिश्चितता वाढल्याने गुरुवारी अमेरिकेच्या शेअर बाजारात घसरण दिसून आली. 'एस अँड पी ५००' ०.३ टक्क्यांनी, तर 'डाऊ जोन्स' १९३ अंकांनी घसरला. तर कच्च्या तेलाच्या किमती १०२.४३ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत.
नौदल नाकेबंदीचे आव्हान
तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांनी यापूर्वी व्हेनेझुएला आणि क्युबावर ज्याप्रमाणे नौदल नाकेबंदी केली होती, त्या तुलनेत इराणचे आव्हान वेगळे आहे. इराणच्या रणनीतीमुळे अमेरिकेत महागाई वाढली आहे. येत्या निवडणुकांत पेट्रोलच्या किमती ट्रम्प यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या अडचणीच्या ठरू शकतात.