Indonesia Mount Dukono Volcano Eruption: इंडोनेशियामध्ये उत्तर मालुकू प्रांतातील माउंट डुकोनो या सक्रिय ज्वालामुखीचा शुक्रवारी सकाळी भीषण उद्रेक झाला. प्रशासनाने बंदी घातलेली असतानाही जीवाची पर्वा न करता शिखरावर गेलेल्या २० गिर्यारोहकांपैकी ३ जणांचा यात मृत्यू झाला असून, मृतांमध्ये दोन सिंगापूरच्या नागरिकांचा समावेश आहे. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
शुक्रवारी सकाळी माउंट डुकोनोच्या मालुपांग वारिरांग क्रेटरमध्ये अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे आकाशात सुमारे १० किलोमीटर उंचीपर्यंत राख आणि धुराचे लोट उसळले. स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की संपूर्ण हलमहेरा बेट हादरले. ढिगाऱ्यातून बाहेर पडलेली गरम राख आणि धुरामुळे टोबेलो शहराच्या दिशेने काळोख पसरला.
बंदी असताना शिखरावर चढाई
या अपघाताच्या वेळी ज्वालामुखीच्या उतारावर २० गिर्यारोहक होते. यात ९ सिंगापूरचे आणि ११ इंडोनेशियन नागरिक होते. धक्कादायक म्हणजे, डिसेंबर २०२५ पासून हा भाग अलर्ट लेव्हल २ वर होता आणि प्रशासनाने ज्वालामुखीच्या ४ किलोमीटर परिघात जाण्यास सक्त मनाई केली होती. मात्र, गिर्यारोहकांनी प्रवेशद्वारावरील धोक्याचा बोर्ड आणि इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून केवळ सोशल मीडिया कंटेंटसाठी जीव धोक्यात घातला.
मृतांचे मृतदेह अजूनही डोंगरावरच
पोलिस प्रमुख एरलिक्सन पासारीबू यांनी दिलेल्या माहितीनुसार, यात ३ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला असून यात २ सिंगापूरचे, १ स्थानिक आहे. १५ गिर्यारोहकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे, त्यापैकी काही जखमी आहेत. अजूनही २ जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. ज्वालामुखीची हालचाल अजूनही सुरू असल्याने आणि विषारी वायूमुळे बचाव पथकाला मृतदेह खाली आणण्यात अडचणी येत आहेत.
गाईड आणि पोर्टरवर गुन्हे दाखल होणार?
स्थानिक लोकांना या धोक्याची कल्पना असल्याने ते या भागात जात नाहीत, मात्र परदेशी पर्यटकांना तिथे नेल्याबद्दल संबंधित गाईड आणि पोर्टरवर पोलीस गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. "विदेशी पर्यटक सोशल मीडियासाठी कोणत्याही थराला जातात आणि त्यामुळे अशा दुर्घटना घडतात," असे पोलिसांनी सांगितले केले.
पॅसिफिक रिंग ऑफ फायरचा धोका
इंडोनेशिया हा देश पॅसिफिक रिंग ऑफ फायरवर आहे, जिथे टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे भूकंप आणि ज्वालामुखीचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. इंडोनेशियात तब्बल १३० सक्रिय ज्वालामुखी आहेत. ज्या दिवशी इंडोनेशियात हा स्फोट झाला, त्याच दिवशी जपानच्या साकुराजिमा ज्वालामुखीचाही उद्रेक झाला, ज्यामुळे ३,५०० मीटर उंच धुराचे लोट पसरले होते.
Web Summary : Mount Dukono's eruption in Indonesia killed three hikers, including two Singaporeans. Despite warnings, twenty hikers climbed the volcano, resulting in a massive ash cloud. Rescue efforts are ongoing but hampered by ongoing volcanic activity.
Web Summary : इंडोनेशिया के माउंट डुकोनो में विस्फोट से दो सिंगापुरवासियों सहित तीन पर्वतारोहियों की मौत हो गई। चेतावनी के बावजूद, बीस पर्वतारोही ज्वालामुखी पर चढ़ गए, जिससे राख का विशाल बादल बन गया। बचाव प्रयास जारी हैं, लेकिन ज्वालामुखी गतिविधि में बाधा आ रही है।