Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 09:25 IST

आर माधवनची 'ही' पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आर. माधवन आणि त्याची पत्नी सरिता बिर्जे यांच्या लग्नाला २६ वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाआधी ८ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर १९९९ मध्ये हे जोडपे विवाहबंधनात अडकले होते. अलीकडेच माधवनने सोशल मीडियावर एक विशेष पोस्ट शेअर करत त्यांच्या नात्याचं सीक्रेट सांगितलं आहे. कोल्हापूरमध्ये एका पब्लिक स्पीकिंग क्लासमध्ये सरिता माधवनची विद्यार्थिनी होती आणि तिथूनच त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली होती.

माधवनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक रंजक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये पुरुषांना आपल्या जोडीदाराकडून अपेक्षित असलेल्या ५ गोष्टींची यादी दिली आहे. यामध्ये त्याने नमूद केले की, अनेकदा पुरुषांना आपल्या पत्नीकडून काही गोष्टी हव्या असतात पण त्या विचारताना त्यांना संकोच वाटतो. या यादीत कधीतरी पत्नीने स्वतः पुढाकार घेणे, जाहीरपणे पतीचे कौतुक करणे, सतत प्रेम व्यक्त करणे, मनातील विश्वास उघडपणे बोलून दाखवणे आणि बाहेरील जगापेक्षा पतीला प्राधान्य देणे या गोष्टींचा समावेश आहे.

एका मुलाखतीदरम्यान माधवनने आपल्या सुखी वैवाहिक आयुष्याचे गुपितही सांगितले होते. तो म्हणालेला की, "आमच्यातही इतर जोडप्यांप्रमाणेच भांडणे होतात, पण आम्ही एकमेकांचा खूप आदर करतो. सरितासाठी मी केवळ एक नॅशनल स्टार नाही, तर तिचा बरोबरीचा जोडीदार आहे. मी किती नशीबवान आहे याची जाणीव करून देण्याची मी एकही संधी सोडत नाही." या दोघांना वेदांत नावाचा मुलगा असून त्याने वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्र न निवडता जलतरणपटू म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. वेदांत अतिशय शिस्तबद्ध असून ऑलिम्पिक मेडल आणायचं हे त्याचं ध्येय आहे.

आर. माधवनच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, नुकताच तो 'धुरंधर: द रिव्हेंज' मध्ये झळकला होता. येणाऱ्या काळात तो 'सर्कल', 'अल्फा', 'GDN' आणि 'अधीरष्टसाली' यांसारख्या विविध चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रदीर्घ काळ सिनेसृष्टीत राहूनही माधवन आपल्या वैयक्तिक आयुष्यातील साधेपणा आणि पत्नीसोबतच्या घट्ट नात्यामुळे चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरतो.

English
हिंदी सारांश
Web Title : R. Madhavan reveals men's 'heart's desires' after 26 years of marriage.

Web Summary : After 26 years of marriage, R. Madhavan shared a post about unspoken expectations men have from their wives, including appreciation, open communication, and prioritization. He values mutual respect and considers himself lucky to have Sarita as his partner. The couple has a son, Vedaant, a swimmer.
टॅग्स :आर.माधवनबॉलिवूडरिलेशनशिप