रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 13:11 IST2026-04-29T12:49:01+5:302026-04-29T13:11:57+5:30
ऑक्टोबर २०२३ मध्ये, रशियाने या प्रकल्पासाठी युरेनियमची पहिली खेप बांगलादेशला दिली. यामुळे अणुऊर्जेवर वीज निर्मितीची क्षमता असलेला बांगलादेश हा जगातील ३३ वा देश ठरला.

रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
बांगलादेशातील पाबना जिल्ह्यातील पद्मा नदीच्या काठावर असलेल्या रूपपूर अणुऊर्जा प्रकल्पात मंगळवारपासून युरेनियम इंधन भरण्यास सुरुवात झाली आहे. रशियाच्या सहकार्याने उभारलेला हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे बांगलादेश आता भारत आणि पाकिस्तानच्या पंक्तीत जाऊन बसला असून, अणुऊर्जेपासून वीज निर्मिती करणारा दक्षिण आशियातील तो तिसरा देश ठरणार आहे.
या भव्य प्रकल्पाचे कंत्राट रशियाची सरकारी कंपनी 'रोसाटॉम' कडे आहे. १२.६५ अब्ज डॉलर्स खर्चून हा प्रकल्प उभारला जात असून, यातील ९०% निधी रशियाने कर्ज म्हणून दिला आहे. या प्रकल्पात १,२०० मेगावॅटच्या दोन अणुभट्ट्या असून, पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प २,४०० मेगावॅट वीज निर्मिती करेल.
रशियाने केली मोठी मदत
ऑक्टोबर २०२३ मध्ये, रशियाने या प्रकल्पासाठी युरेनियमची पहिली खेप बांगलादेशला दिली. यामुळे अणुऊर्जेवर वीज निर्मितीची क्षमता असलेला बांगलादेश हा जगातील ३३ वा देश ठरला. या प्रकल्पामध्ये १,२०० मेगावॅट क्षमतेच्या दोन अणुभट्ट्या आहेत. १२ अब्ज अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त खर्च असलेला हा प्रकल्प रशियाच्या आर्थिक आणि तांत्रिक मदतीने पूर्ण केला जात आहे. पद्मा नदीच्या काठावर वसलेल्या या प्रकल्पाची, पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर एकूण २,४०० मेगावॅट वीज निर्मिती क्षमता असणार आहे.
अणुऊर्जा प्रकल्पाची कार्यान्वयन प्रक्रिया आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या कठोर मार्गदर्शक तत्त्वांनुसार टप्प्याटप्प्याने पार पाडली जात आहे. या प्रक्रियेचा पहिला भाग म्हणून, मंगळवारी युनिटमध्ये इंधन भरण्यास सुरुवात झाली.
दक्षिण आशियातील तिसरा अणुऊर्जा उत्पादक देश
या प्रकल्पाच्या शुभारंभाने, बांगलादेश मोठ गटात सामील होण्याच्या तयारीत आहे. या वर्षी ऑगस्टपर्यंत, हा प्रकल्प किमान ३०० मेगावॅट वीज निर्मिती सुरू करेल आणि बांगलादेशच्या राष्ट्रीय ग्रीडला जोडला जाणार आहे. हे उद्दिष्ट साध्य झाल्यावर, बांगलादेश भारत आणि पाकिस्ताननंतर, अणुऊर्जेपासून वीज निर्माण करणारा दक्षिण आशियातील तिसरा देश बनेल.
रशियावर संपूर्ण अवलंबित्व
हा अणुऊर्जा प्रकल्प पूर्णपणे रशियाच्या नियंत्रणाखाली आहे. या प्रकल्पाला ऊर्जा देण्यासाठी लागणारे युरेनियम रशियाकडून येईल आणि वापरानंतर उरलेला धोकादायक अणु कचरा रशिया परत घेऊन जाईल. याचा अर्थ, बांगलादेश आपल्या ऊर्जा सुरक्षेसाठी अनेक दशके रशियावर अवलंबून राहील.
मोठा कर्जाचा डोंगर
हा प्रकल्प अत्यंत खर्चिक आहे. त्याचा एकूण खर्च अंदाजे १२.६५ अब्ज डॉलर्स आहे. या निधीपैकी ९०% रशियाने कर्ज म्हणून दिला आहे.