"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 13:42 IST2026-04-29T13:41:35+5:302026-04-29T13:42:24+5:30
Abhishek Banerjee Rafale, West Bengal Assembly Election 2026: "ज्या गोष्टी पाकिस्तानाविरोधात करायला हव्या, त्या बंगालमध्ये सुरू आहेत"

"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
Abhishek Banerjee Rafale, West Bengal Assembly Election 2026: पश्चिम बंगालमधील १४२ विधानसभा जागांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतदान सुरू आहे. मतदान सुरळीत पार पडावे यासाठी निवडणूक आयोगाने आठ जिल्ह्यांमध्ये केंद्रीय दलाच्या २,३२१ कंपन्या आणि अनेक निरीक्षक तैनात केले आहेत. मात्र, या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे तृणमूल काँग्रेस तीव्र नाराजी व्यक्त करत आहे. पक्षाचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी उपहासाने म्हटले आहे की, आता प्रशासनाने बंगालमध्ये राफेल विमाने तैनात करणे हाच एक पर्याय शिल्लक ठेवला आहे.
हे पाकिस्तानसाठी करायला हवं होतं...
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी उपहासाने म्हणाले, "बंगालमध्ये फक्त राफेल विमाने तैनात करायची शिल्लक राहिली आहेत. आयएनएस युद्धनौकादेखील अजून तैनात करायच्या आहेत. निवडणूक आयोगाने निवडणुकांसाठी एवढी मोठी फौज तैनात केली आहे. जी तैनाती पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध करायला हवी होती, ती बंगालच्या लोकांसाठी केली जात आहे," असा टोला त्यांनी लगावला. मुख्य निवडणूक आयुक्तांवर निशाणा साधत अभिषेक म्हणाले, "निवडणुका अशा प्रकारे घेतल्या जातात का? ज्ञानेश कुमार, तुम्हाला हव्या त्या उमेदवाराला उभे करा. आम्ही ही निवडणूक प्रचंड मताधिक्याने जिंकू. इतकंच नाही, तर तृणमूल काँग्रेस यावेळी २०२१ पेक्षा जास्त जागा जिंकेल."
निवडणुका अशा प्रकारे घेतल्या जातात का?- ममतादीदी
दुसरीकडे, पश्चिम बंगालमधील भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील टीएमसीच्या उमेदवार ममता बॅनर्जी म्हणाल्या, "बाहेरून खूप निरीक्षक आले आहेत. भाजप जे सांगेल ते ते आयोगाचे लोक करत आहेत. जरा आजूबाजूला बघा, आमचे सर्व पोस्टर्स काढण्यात आले आहेत. निवडणुका अशा प्रकारे घेतल्या जातात का? मतदार मतदान करतील, पोलीस किंवा सुरक्षा दलाची इथे गरज नाही. अलीकडेच काही नवीन लोकांना आणले गेले आणि ते त्यांना जे हवे ते करत आहेत. ते दहशतवाद पसरवत आहेत," असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.