जगभर: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं नवं रूप! शिक्षिकेसमोर झाले लीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 12:55 IST2026-05-16T12:54:02+5:302026-05-16T12:55:05+5:30
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शालेय जीवनातील आपल्या शिक्षिकेची नुकतीच भेट घेतली. या वयोवृद्ध शिक्षिकेचं नाव गुरेविच.

जगभर: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं नवं रूप! शिक्षिकेसमोर झाले लीन
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे एक युद्धखोर, कुटिल आणि अत्यंत कठोर शासक म्हणून प्रसिद्ध आहेत. आपल्याला जे हवं आहे, ते काहीही करून ते मिळवतातच आणि आपली खासगी, वैयक्तिक माहिती ते कधीही जाहीर होऊ देत नाहीत याबाबत त्यांची ख्याती आहे. पण त्यांची एक वेगळीच बाजू समोर आल्यानं सध्या जगभरात त्यांच्याविषयी चर्चा सुरू आहे.
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शालेय जीवनातील आपल्या शिक्षिकेची नुकतीच भेट घेतली. या वयोवृद्ध शिक्षिकेचं नाव गुरेविच. पुतिन लहान, शालेय विद्यार्थी असताना त्या पुतिन यांना जर्मन भाषा शिकवायच्या. राष्ट्राध्यक्ष कार्यालयानं सांगितलं की, पुतिन यांनी गुरेविच यांना मॉस्कोमधील विजय परेडमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं होतं. त्यामुळे त्या मॉस्कोमध्ये आल्यानंतर पुतिन यांनी केवळ त्यांची भेटच घेतली नाही, तर त्यांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं. विद्यार्थी-शिक्षक भेटीचा हा व्हिडिओ सध्या जगभर चर्चेत आहे.
पुतिन स्वतः मॉस्कोमधील त्या हॉटेलमध्ये गेले, जिथे व्हेरा गुरेविच वास्तव्यास होत्या. ते त्यांना स्वतःच्या कारमधून क्रेमलिनमध्ये घेऊन आले, जिथे त्यांनी एकत्र जेवण केलं. व्हेरा गुरेविच या लेनिनग्राड स्कूल क्रमांक १९३ मध्ये व्लादिमीर पुतिन यांच्या वर्गशिक्षिका होत्या. आता त्या खूप वयोवृद्ध झाल्या आहेत. त्यांचे विद्यार्थी असलेले पुतिनही आता ७३ वर्षांच्या जवळ पोहोचले आहेत. पुतिन आणि व्हेरा गुरेविच यांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फुलांचा गुच्छ घेऊन पुतिन आपल्या जुन्या शिक्षिकेला राष्ट्राध्यक्ष निवासस्थानी जेवणासाठी घेऊन जायला पोहोचले, तेव्हा त्या अशक्तपण असूनही उठून उभ्या राहिल्या आणि त्यांनी पुतिन यांना मिठी मारली. व्हेरा आपल्या जुन्या विद्यार्थ्याला राष्ट्राध्यक्ष म्हणून समोर पाहून भावुक झाल्या. पुतिन यांना मिठी मारल्यानंतर त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. व्हेरा यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचंही पुतिन यांनी मनापासून स्वागत केलं. त्यानंतर पुतिन यांनी स्वतः आधार देत व्हेरा यांना कारपर्यंत नेलं आणि गाडीत बसवलं.
रशियन माध्यमांनुसार, पुतिन यांनी आपल्या शिक्षिकेसोबत एकांतात काही वेळ संवाद साधला आणि त्यानंतर ते त्यांना रात्रीच्या भोजनासाठी घेऊन गेले. व्हेरा यांनी बालपणी लेनिनग्राडमध्ये (आताचं सेंट पीटर्सबर्ग) पुतिन यांना जर्मन भाषा शिकवली होती. व्हेरा यांनी ज्या पद्धतीनं त्यांना शिकवलं होतं, ते त्यांच्या अगदी मनात ठसलं. त्यांच्यामुळेच पुतिन जर्मन भाषा अत्यंत चांगल्या प्रकारे बोलतात.
रशियाची राजधानी मॉस्को येथे नुकताच वार्षिक विक्टरी डे (विजय दिवस) साजरा करण्यात आला. यावेळी मॉस्कोमधील प्रसिद्ध रेड स्क्वेअर येथे भव्य लष्करी परेड पार पडली, ज्यामध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन सहभागी झाले होते.
व्हिक्टरी डे हा नाझी जर्मनीवर सोव्हिएत संघानं मिळवलेल्या विजयाची आठवण करून देणारा दिवस आहे. या कार्यक्रमासाठी पुतिन यांचे माजी शिक्षक आणि त्यांच्याशी संबंधित अनेक व्यक्तींना आमंत्रित करण्यात आलं होतं. पुतिन यांची प्रतिमा आतापर्यंत अतिशय कठोर अशीच राहिलेली आहे. त्यांना कधीच कोणी भावुक झालेलं पाहिलेलं नाही. त्यामुळे आपल्या माजी शिक्षिकेबाबत त्यांनी दाखवलेला इतका आदर त्यांच्याप्रति ते लीन झालेले पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.