‘आनंद’ मरा नहीं, आनंद कभी नहीं मरते...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 13:46 IST2026-05-16T13:46:05+5:302026-05-16T13:46:59+5:30
Tribute to anand nadkarni: मराठी वाचकांना ‘मानसशास्त्र’ विषयाची हसत-खेळत व जिवंत ओळख त्याने करून दिली. पण आनंद सर्वात जास्त खुलायचा तो स्टेजवर !

‘आनंद’ मरा नहीं, आनंद कभी नहीं मरते...!
-डॉ. अभय बंग
काल पहाटे पाच वाजता डॉ. आनंद नाडकर्णी गेले. पोटातल्या कॅन्सरसाठी त्यांचे मोठे ऑपरेशन आठवड्यापूर्वीच झाले होते. त्यातून त्यांची उत्तम सुधारणा होत असतांना ते अचानक गेले. म्हणून अधिक धक्कादायक. आनंदचे स्मरण महाराष्ट्र काय म्हणून करेल? मानसरोग उपचार तज्ज्ञ म्हणून त्याने हजारो रुग्णांचा उपचार केला. त्यांच्या जीवनात आशा आणली.
ठाण्याला इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ (IPH) नावाची मानसिक आरोग्यावर व्यापक काम करणारी संस्था स्थापन केली. डॉ. सुनंदा व अनिल अवचट यांनी पुण्याला सुरू केलेल्या ‘मुक्तांगण’ व्यसनमुक्ती केंद्राच्या स्थापनेपासून त्याचा सहभाग होता. ते दोघे गेल्यावर तर तो मुक्तांगणचा मुख्य मार्गदर्शक व आधारस्तंभ होता.
गडचिरोलीत आमच्या ‘सर्च’ संस्थेद्वारे चालविल्या जाणाऱ्या व्यसनमुक्ती उपचाराच्या कामाचाही तो सल्लागार होता. शोधग्रामला आला असतांना एका भेटीत रात्री त्याने इथल्या व्यसनींसाठी एक प्रार्थना-गीत लिहिले. ‘चांदव्याची दिवली लागे उभ्या अंधारात.’ ती प्रार्थना अनेक वर्षे आमचे व्यसनी-रुग्ण म्हणत असत.
तो डॉक्टर होता. कवी होता. नाटककार होता. चित्रपटाचा कथा-लेखक होता. जवळपास दोन डझन लोकप्रिय पुस्तकांचा तो लेखक होता. मराठी वाचकांना ‘मानसशास्त्र’ विषयाची हसत-खेळत व जिवंत ओळख त्याने करून दिली. पण आनंद सर्वात जास्त खुलायचा तो स्टेजवर !
‘वेध’ सारखे उपक्रम त्याने महाराष्ट्राच्या अनेक शहरात नेले. त्यात जवळपास तीन दिवस तो वक्ता, सूत्रधार, मुलाखातकार, गायक व प्रेरणास्त्रोत सर्व काही होता. महाराष्ट्रातील लाख-दोन लाख किशोरवयीन मुली-मुले व त्यांचे पालक यांना ‘मी पुढे काय होऊ ?’ या प्रश्नाचा वेध घेण्यास त्याने मदत केली.
यशस्वी-अयशस्वी माणसांच्या वेगळ्या वाटांची कहाणी त्यांच्या तोंडून कुशलपणे वदवून घेणारा तो उत्तम मुलाखातकार होता. माणसाच्या आतला माणूस स्टेजवर बाहेर प्रकट व्हायला आनंद नाजूकपणे मदत करायचा. माझ्या अनेक जाहीर मुलाखती त्याने घेतल्या आहेत. प्रश्न विचारायचे त्याचे कौशल्य अनुभवण्यासारखे असायचे. थोडक्यात, पुलं चे करण्यात आलेले वर्णन ‘बहुरूपी’ आनंदला चपखल लागू पडायचे.
अनेक संकटे त्याने झेलली. लहानपणी पोलियोसारखा रोग व आलेली मर्यादा, नंतर दोन्ही पायांवर हत्तीपाय सारखी त्रासदायक सूज, बांधाव्या लागणाऱ्या पट्ट्या, वजनवाढ, हे सर्व अंगावर घेऊन व सोसूनही तो कायम आनंद व उत्साहाचा झरा होता. सदैव हसतमुख.
पंचावन्न वर्षांपूर्वी हृषिकेश मुखर्जींनी एक अमर सिनेमा बनवला होता, आनंद. तो चित्रपट त्यांनी राजकपूरला अर्पण केला होता. वस्तुत: तो चित्रपट आपल्या आनंदाला तंतोतंत लागू पडला असता. अगदी, त्यात नायकाला झालेल्या पोटाच्या कॅन्सरपर्यंत. त्या चित्रपटाचा शेवट अमिताभ बच्चनच्या आवाजात होतो. तो आवाज म्हणतो “आनंद मरा नहीं. आनंद कभी नहीं मरते!”
(लेखक सर्च संस्थेचे चेअरमन आहेत.)