बांगलादेशच्या कापड उद्योगात आता भारताविरोधी 'धागा' पेटला! १ फेब्रुवारीपासून सर्व सूत गिरण्या बंद करण्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 18:23 IST2026-01-25T18:22:17+5:302026-01-25T18:23:30+5:30
Bangladesh Textile Crisis: बांगलादेशच्या कताई गिरण्या बंद होणार! भारतीय सुताच्या आयातीवरून वाद चिघळला. BTMA चा कडक इशारा, १० लाख कामगार संकटात.

बांगलादेशच्या कापड उद्योगात आता भारताविरोधी 'धागा' पेटला! १ फेब्रुवारीपासून सर्व सूत गिरण्या बंद करण्याचा इशारा
ढाका: बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला वस्त्रोद्योग सध्या एका मोठ्या संकटात सापडला आहे. बांगलादेश टेक्सटाईल मिल्स असोसिएशनने १ फेब्रुवारी २०२६ पासून देशातील सर्व सूत गिरण्या अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. भारताकडून होणाऱ्या शुल्कमुक्त धागा आयातीमुळे स्थानिक उद्योगांना मोठा तोटा सहन करावा लागत असल्याचा आरोप गिरणी मालकांनी केला आहे.
बांगलादेशमधील तयार कपडे निर्यातदार भारताकडून मोठ्या प्रमाणात शुल्कमुक्त सूत किंवा धागा आयात करतात. भारतीय सुताच्या कमी किमतींमुळे बांगलादेशच्या स्थानिक सूत गिरण्यांना बाजारात टिकणे कठीण झाले आहे. BTMA च्या दाव्यानुसार, सध्या स्थानिक गिरण्यांकडे सुमारे १२,५०० कोटी टका किमतीचा धागा पडून आहे, कारण त्याला खरेदीदार मिळत नाहीयेत.
स्थानिक गिरण्यांच्या प्रमुख मागण्या
भारताकडून होणाऱ्या १० ते ३० काउंटच्या सुतावर त्वरित आयात शुल्क लादण्यात यावे.
सूत गिरण्यांना मिळणाऱ्या नैसर्गिक वायूचा (Gas) पुरवठा अखंडित आणि सवलतीच्या दरात करावा.
वाढत्या बँक व्याजातून दिलासा मिळावा.
काय परिणाम होईल?
१ फेब्रुवारीपासून गिरण्या खरोखरच बंद झाल्या, तर बांगलादेशच्या कापड उद्योगातील सुमारे १० लाखांहून अधिक कामगारांच्या रोजगारावर टांगती तलवार येईल. तसेच, बांगलादेशच्या एकूण निर्यातीपैकी ८५% वाटा असलेल्या तयार कपड्यांच्या (RMG) पुरवठा साखळीवर याचा मोठा परिणाम होईल. येत्या १२ फेब्रुवारीला होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे संकट शेख युनूस सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे.